# लग्नघटिका हिश्‍शाच्या भीतीने संपत्तीचे हस्तांतर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

लग्नानंतरही हीच खेळी
खास करून आयटीत काम करणाऱ्यांच्या बाबतीत पोटगी द्यावी लागू नये म्हणून आधीच उपाययोजना करण्याचे प्रकार घडत आहेत. लग्नापूर्वी आणि लग्नानंतरदेखील असेच प्रकार केले जात आहेत. त्यामुळे मुलीदेखील हुशार झाल्या असून, त्यांचे खरे उत्पन्न त्या सासरच्या व्यक्तींपासून लपवून ठेवून पैशाची बचत करतात, अशी माहिती वकील सुप्रिया कोठारी यांनी दिली.

पुणे - एकमेकांची साथ किती दिवस टिकेल आणि मध्येच नाते संपुष्टात आले, तर त्याचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार नाही ना, याचा विचार आजचे तरुण लग्नापूर्वीच करीत आहेत. त्यामुळे घटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीतील हिस्सा द्यावा लागू नये म्हणून लग्न ठरल्यानंतर मुले त्यांच्या नावावरील मालमत्ता आई-वडील किंवा भाऊ-बहिणींच्या नावावर करीत आहेत.

कुटुंबातील व्यक्तींना बक्षीस देऊन संपत्तीची मालकी बदलली जात आहे. तसेच, कर्ज काढून त्यांचे हप्ते भरीत असल्याचे दाखविले जाते. यामागे कारण एकच की, भविष्यात पत्नीबरोबर पटले नाही, तिला घटस्फोट द्यावा लागला; तर आपल्या नावावर काहीच नाही, मीच बॅंकेचे हप्ते भरून हैराण आहे. त्यामुळे तुला पोटगी काय देणार, असा प्रश्‍न उपस्थित करता यावा, असा उद्देश असतो.

लग्नाची स्वप्नं रंगवत असताना पती-पत्नीला एकमेकांच्या स्वभावाची माहिती होते. तसेच, पगार कोणत्या बाबींसाठी वापरायचा आहे, याच्या नियोजनाची कल्पना त्यांना येते. पत्नी तिचा पगार पतीच्या कुटुंबासाठी देणार नसेल, तर त्याच्या मनात भीती निर्माण होते. लग्नानंतर तिने माहेरी पैसे देणे सुरूच ठेवले, तर माझे नियोजन कोलमडेल. तसेच, वाद झाल्यास ती संपत्तीत हक्क मागणार, याची भीती त्याला वाटू लागते. एकुलता मुलगा असेल, तर लग्न झाल्यानंतर तो आपल्याकडे लक्ष देईल की नाही, अशी पालकांना चिंता असते. त्यामुळे मुलाने संपत्ती नावावर करून दिल्यानंतर ते समाधानी होतात. मात्र, संपत्तीपेक्षाही त्याने सांभाळ करावा, अशी त्यांची इच्छा असते.

Web Title: series wedding ceremonies role caution wedding