लसीकरण केंद्रावर पोहोचले आदर पूनावाला; ट्विटरवरून दिली माहिती

टीम ई सकाळ
Saturday, 13 February 2021

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी पुण्यातील लसीकरण केंद्राला भेट दिली.

नवी दिल्ली - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी पुण्यातील लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी लसीकरण केंद्रातील सेटअपचं त्यांनी कौतुक केलं. तसंच लसीकरणावेळी साक्षीदार झाल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

पूनावाला यांनी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक इथं असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली होती. आदर पूनावाला म्हणाले की, लसीकरण केंद्रावरचा अनुभव सुंदर होता. इथला सेटअप जबरदस्त असा होता असंही त्यांनी म्हटलं. 

शनिवारपासून भारतात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. ज्यांना 16 जानेवारीला लस देण्यात आली आहे त्यांना शनिवारी दुसरा डोस दिला जाईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

पुण्यात लसीकरणाच्या केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या आठवड्यात 25 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात 23 केंद्रात लसीकरण केलं जातं. तसंच आतापर्यंत 20 हजार जणांना लस देण्यात आली आहे. कोविन अॅपवर शहरातील 55 हजार जणांची नोंदणी करण्यात आली आहे. अजून 35 हजार जणांना लस देण्याचं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारतात शनिवारपासून दुसऱा डोस देण्यास सुरु केलं जाईल. याबाबतची माहिती ऑटोमेटड एसएमएस आणि फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना 28 व्या दिवशीच लस घेतली पाहिजे असं नाही. 4 ते 6 आठवड्यांच्या कालावधीतही लस घेता येईल. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 77 लाख 66 हजार 319 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यापैकी 58 लाख 65 हजार आरोग्य कर्मचाऱी तर 19 लाख कोरोना योद्धे आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum ceo adar poonawala visited ruby hall clinic vaccination center