पारशी धर्मीयांसाठी कोरोना लसीचे 60 हजार डोस राखीव; जाणून घ्या कारण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जुलै 2020

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॉजेनेकाकडून तयार करण्यात येणाऱ्या वॅक्सिन ट्रायल आणि उत्पादनामध्ये सीरम इन्स्टिट्यूट पार्टनर आहे. या लशीची मानवी चाचणी सुरू असून भारतातही ट्रायल घेण्यासाठी मंजुरी घेतली जात आहे.

पुणे - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागून राहिलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत सुरु असलेल्या लशीच्या संशोधनाला यश मिळालं असून त्याची निर्मिती भारतातील आघाडीची कंपनी करणार आहे. दरम्यान, एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डमध्ये तयार होणाऱ्या लशीची भारतात निर्मिती करणार आहे. यातील 50 टक्के वाटा देशासाठी असणा आहे. मात्र हीच कंपनी पारशी लोकांसाठी वॅक्सिनच्या 60 हजार बाटल्या राखून ठेवणार असल्याचं आता म्हटलं जात आहे. कंपनीच्या सीईओंनी केलेल्या या ट्विटमुळे अशी चर्चा रंगली आहे.

भारतातील अब्जाधीश उद्योगपतींमध्ये डॉक्टर सायरस पूनावाला यांचे नाव घेतले जाते. त्यांचा मुलगा आदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॉजेनेकाकडून तयार करण्यात येणाऱ्या वॅक्सिन ट्रायल आणि उत्पादनामध्ये सीरम इन्स्टिट्यूट पार्टनर आहे. या लशीची मानवी चाचणी सुरू असून भारतातही ट्रायल घेण्यासाठी मंजुरी घेतली जात आहे.

हे वाचा - देशात कोरोनाचा उद्रेक ! ४८ तासांत जवळपास १ लाख कोरोनाबाधितांची भर

आदर पूनावाला यांना टॅग करताना उद्योगपती रॉनी स्क्रूवाला यांनी ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, पारशी लोकांची संख्या खूपच कमी राहिली आहे. वॅक्सिन आल्यानंतर या लोकांना वाचवण्यासाठी काम करण्यासाठी एक लॉबी काम करत आहे. तर पारशी लोकांसाठी याची मागणी का केली जाऊ नये. त्यातही जेव्हा एक पारशीच वॅक्सिनच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे.

रॉनी स्क्रूवाला यांच्या ट्विटला उत्तर देताना आदर पूनावाला यांनी म्हटलं की, हो, आम्ही आपल्या लोकांसाठी पुरेशी सोय करू. एकाच दिवसात इतकं उत्पादन होतं की यामुळे पृथ्वीवर असलेल्या सर्व पारशी लोकांसाठी डोस तयार होती.

हे वाचा - कोरोना दूर ठेवण्यासाठी मुलांना पाजली दारु

आदर पूनावाला यांना रॉनी स्क्रूवाला यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नामुळे ही चर्चा झाली असली तरी याआधी सायरस पूनावाला यांनीही असे संकेत दिले होते. एक न्यूजलेटरही त्याबाबत व्हायरल होत आहे. यात म्हटलं आहे की, पूनावाला यांनी पारशी लोकांसाठी खूप काही केलं आहे. बॉम्बे पारशी पंचायतीचे माजी प्रमुख दिनशॉ मेहता यांनी सायरस पूनावाला यांना पाठवलेला मेसेज सध्या ट्विटरवर शेअर केला जात आहे.

Image

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, वॅक्सिनच्या शोधात तुमच्या सीरम इन्स्टिट्यूटचं नाव आघाडीवर आहे. पारशी समुदाय अल्पसंख्यांक आहे आणि प्रत्येक पारशी व्यक्तीची सुरक्षा महत्वाची आहे. भारतात पारशी लोकांची संख्या 60 हजार आहे आणि कोरोनामुळे जवळपास 40 पारशी लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे विनंती करतो की पारशी लोकांसाठी 60 हजार वॅक्सिनच्या बाटल्या राखून ठेवा. भारतात विशेषता: मुंबई, पुण्यात पारशी समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे. जगात पारशी लोकांची एकूण लोकसंख्या दीड लाखांपेक्षा कमी आहे.

मेहता यांच्या मेसेजला डॉक्टर सायरस पूनावाला यांनी तेव्हाच उत्तर देत सहमती दिल्याचंही म्हटलं जात आहे. पारशी समुदायासाठी वॅक्सिन राखून ठेवण्याचं आश्वासनही दिल्याचं म्हटलं जातं. त्यातच रॉनी स्क्रूवाला आणि आदर पूनावाला यांच्यातील ट्विट चॅटमुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute will reserve covid vaccine 60000 vials for parsi adar poonawala tweet