पुणे : 'एचए'चे कर्मचारी होणार 'मालामाल'; दीडपट रक्कम मिळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

- व्यवस्थापनाकडून तत्वतः मान्यता

- उर्वरीत देणीही 31 जानेवारीपर्यंत देणार

पिंपरी : हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीतील सुमारे 104 स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांना "व्हीआरएस'पोटी दीडपट रक्कम देण्याला कंपनी व्यवस्थापनाने तत्वतः मान्यता दिली आहे. येत्या दहा दिवसांत कामगारांना ही रक्कम दिली जाणार असून, कामगारांची उर्वरीत देणी देखील 31 जानेवारीपर्यंत अदा केली जातील, असे आश्‍वासन व्यवस्थापनाने दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एचए कंपनीमधील 250 स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांपैकी 104 कामगारांना 'व्हीआरएस'पोटी दीडपट रकमेऐवजी एकपटच रक्कम दिल्याने व्यवस्थान आणि स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. एचए मजदूर संघ (एचएएम) कडून व्यवस्थापनाला सर्व देणी देण्याबाबत दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यावर व्यवस्थापनाने अखेर सामंजस्याची भूमिका घेत "व्हीआरएस'ची उर्वरीत रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे, दोन्ही बाजूंकडील तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. 

एचए मजदूर संघाचे सरचिटणीस संजय भोसले म्हणाले, "कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ आणि डीजीएम (आर्थिक) सी.व्ही.पूरम यांच्यात सोमवारी चर्चा झाली. त्यानंतर, पूरम आणि वरिष्ठ (पर्सोनेल) व्यवस्थापिका सुनीता शिवतारे यांनी येत्या 8 ते 10 दिवसांत 104 कामगारांना "व्हीआरएस'च्या एकपट ऐवजी दीडपट रक्कमा देण्यास तत्वतः मान्य केले आहे. यापूर्वी कामगारांना "पीएफ', थकीत वेतनापोटी रक्कम मिळाली आहे. आवश्‍यक (एनडीसी) प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील आठवड्यापासून ग्रॅच्युएटीचेही धनादेश मिळण्यास सुरुवात होणार आहे. वैद्यकीय बिलांसह या रकमा 31 जानेवारीपर्यंत मिळतील. बोनस आणि "लिव्ह ट्रॅव्हल अलाऊंन्स'बाबत कामगारांची व्यवस्थापनाशी चर्चा चालू आहे.'' 

माजी सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे म्हणाले, "रजा रोखीकरणाच्या रक्कमा निश्‍चित करण्यात काही त्रुटी राहिली होत्या. त्यातही सुधारणा केल्या जाणार आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Servant of hindustan antibiotics will get some amount on VRS