#ServerDown ‘सर्व्हर डाउन’ कार्यालय

अनिल सावळे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - राज्याच्या महसूल खात्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करताना संगणकाचा कधी सर्व्हर डाउन होतो. तर कधी त्याचा वेग कमी असतो. शहरातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. परिणामी, दस्त नोंदणीला विलंब होत असल्यामुळे नागरिकांना कार्यालयांमध्ये तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. 

पुणे - राज्याच्या महसूल खात्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करताना संगणकाचा कधी सर्व्हर डाउन होतो. तर कधी त्याचा वेग कमी असतो. शहरातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. परिणामी, दस्त नोंदणीला विलंब होत असल्यामुळे नागरिकांना कार्यालयांमध्ये तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. 

जमीन, सदनिकांसह मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. ऑनलाइन भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र अशा प्रकारचे दस्त नोंदविले जातात. दस्त नोंदणीसाठी ‘आय-सरिता’ ही ऑनलाइन सुविधा सुरू केली. परंतु त्यात सतत अडचणी येत असून, त्यावर ठोस अद्याप उपाययोजना केलेल्या नाहीत. तासाभरात पूर्ण होणाऱ्या ऑनलाइन भाडेकरार नोंदणीला सर्व्हर डाउनमुळे दोन-तीन तास लागत आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालय आणि सर्व्हर डाउन हे जणू समीकरणच बनले आहे. यावर ठोस उपाययोजना कधी करणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अनेकदा सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जाते. शिवाय, नागरिकांना पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा आणि स्वच्छतागृह अशा सुविधांचा अभाव आहे. याबाबत असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी, रवींद्र चौकसे, राजेंद्र दोशी, अनिल पाटील, संजय ढोकळे, कैलास फोफलिया, गणेश घुमे आणि नंदकुमार संचेती या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ‘क्‍लाउड’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

नागरिकांना मनःस्ताप
मुंढवा, हडपसर - मेगा सेंटरमधील दुय्यम सहायक निबंधक हवेली क्रमांक तीनमध्ये दस्तनोंदणी, फ्लॅट रजिस्ट्रेशन, शेतजमिनीचे दस्तावेज, गहाणवट, भाडेकराराच्या दस्त नोंदणीची कामे केली जातात. परंतु संगणकाच्या सर्व्हरची गती संथ असल्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. 

दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया - हिंगणे राजू (हिंगणेमळा, हडपसर) आणि सुधीर सोमवंशी - सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणीला एक आठवडा उशीर झाला. दस्त नोंदणीसाठी सर्व्हरची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

सर्व्हर कधी बंद होत नाही. पण तो संथ गतीने चालतो. त्यामुळे दस्त नोंदणीस उशीर होतो. तोपर्यंत नागरिकांना थांबून राहावे लागते.
- अजित फडतरे, दुय्यम सहायक निबंधक वर्ग- २ 

तुकाराम घोलप (व्यावसायिक) : व्यवसायामुळे अनेकदा दस्त नोंदणीसाठी कार्यालयात यावे लागते. परंतु इंटरनेट सुविधा बंद पडल्यावर तीन ते चार तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

श्‍याम नागवा (रिअल इस्टेट ब्रोकर) : करारनामा करण्यासाठी येथे यावे लागते. परंतु बऱ्याचदा इंटरनेट सेवा बंद पडल्यावर ग्राहकांना बसून राहावे लागते. त्यामुळे परिणाम दस्त नोंदणीवर होत आहे.

इंटरनेट सुविधा बंद पडल्यावर दस्त नोंदणीला विलंब होतो. राज्यात सर्वच ठिकाणी सेवा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. इंटरनेट सुविधा व्यवस्थित सुरू असल्यास तुलनेत जास्त दस्त नोंदणी करता येईल.
- सुभाष जाधव (सबरजिस्ट्रार, क्र. २)

सर्व्हर बंद पडणे, संथ चालणे यामुळे गैरसोय होत आहे. दस्त नोंदणीस उशीर होत असल्यामुळे चिडचिड होते. सर्व्हर संथ असल्यामुळे दस्त नोंदणीस वेळ लागतो. 
- सूरज कोळी, ग्राहक, फातिमा नगर

ग्राहक- बिल्डरमध्ये वाद
खडकवासला - सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेटचा सर्व्हर डाउन असतो. त्यामुळे कर्वेनगर, माणिकबाग, भुसारी कॉलनी, हिंजवडी, पौड परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. सर्व्हर डाउनमुळे दस्ताची नोंदणी पूर्ण होत नाही. दस्त नोंदणीवेळी मूळ कागदपत्रे स्कॅन करून संबंधित व्यक्‍तीला परत केली जातात. परंतु सर्व्हर डाउनमुळे स्कॅनिंगला अडचणी येतात. नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे ग्राहक आणि बिल्डरमध्ये वाद होत आहेत.

इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचे ग्रहण 
बिबवेवाडी - येथील सहदुय्यम निबंध कार्यालयातील इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी वारंवार खंडित होते. त्यामुळे दररोज दस्त नोंदणी लांबणीवर पडत आहे. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकाळत बसून राहावे लागत आहे. सहदुय्यम निबंधक कार्यालय (वर्ग-२) हवेली क्रमांक २ हे पुष्पा हाइट इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आहे. परंतु कोठेही सहदुय्यम निबंधक कार्यालय असल्याचा फलक नाही. 

 

Web Title: Server Down Office