Pune Rains : पुणेकर उपाशी! स्विग्गी, झोमॅटो, उबर‌‌ इट सेवा‌ पावसाने गारठल्या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

- शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आणि मुठा-मुळा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढल्याने आज सकाळपासूनच नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले होते.
- स्विग्गी, झोमॅटो व उबेर इट या जेवण पुरविणाऱ्या आणि ओला व उबेर या कॅब सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे.

पुणे : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आणि मुठा-मुळा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढल्याने आज सकाळपासूनच नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले होते. त्यामुळे या परिसरात स्विग्गी, झोमॅटो व उबेर इट या जेवण पुरविणाऱ्या आणि ओला व उबेर या कॅब सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे.
 
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत. मुख्य रस्ते बंद झाल्याने पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जेवण ऑर्डर केल्यानंतर त्यांची वेळेत डिलिव्हरी होत नाही. तर पाणी साचलेल्या ठिकाणावरून ऑर्डर आल्यास ती पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. वाकडमध्ये सेवा पुर्ण बंद आहे. त्यामुळे नागरिकांना जेवण मिळणे देखील मुश्‍कील झाले आहे. अशीच काहीशी स्थिती ओला व उबेरच्या बाबतीत आहे. कॅब बुक केल्यानंतर गाडी पोचण्यात मोठा उशीर होत आहे. तर, पाणी साठलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणाहून कॅब बुक केली तर, चालक राईड रद्द करीत आहेत. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला आहे. 

कसबा व मंगळवार पेठ, जुना बाजार, औंध, बाणेर, पाटील इस्टेट, खडकी, बोपोडी, वाकड, हिंजवडी आणि नदी काठच्या सर्व परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. 'सकाळ'च्या एका प्रतिनिधीने स्विग्गीवरून औध परिसरात जेवणाची ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर पार्सल नेमके कुठे द्यायचे याबाबत हॉटेलमधून फोन आला. पत्ता सांगितल्यानंतर त्या ठिकाणी डिलिव्हरी देण्यास थोडासा उशीर होईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच काही परिसरात जेवण पुरविणे शक्‍य नसल्याची माहिती डिलिव्हरी बॉयने दिल्याचे हॉटेल चालकाने सांगितले. 

''इतर दिवसांच्या तुलनेत आज कमी ऑर्डर आल्या आहेत. नदीचे पाणी रस्ते व सोसायट्यांमध्ये घुसल्यामुळे काही ठिकाणी ऑर्डर पुरविणे अवघड झाले आहे. पुणे व पिंपरीला जोडणारे पूल बंद असल्याने औंधला ऑर्डर देणे शक्‍य नाही.''
- नवीन परदेशी, आशापुरी डायनिंग हॉल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: service of Swiggy, Zomato, Uber eat affected due to rain