'जीएसटी'च्या नोंदणीसाठी सेवाकर विभागाची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी संबंधित व्यापारी, उत्पादक आणि व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायाची नोंदणी "जीएसटी'संबंधित पोर्टलवर करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवाकर व उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे.

पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी संबंधित व्यापारी, उत्पादक आणि व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायाची नोंदणी "जीएसटी'संबंधित पोर्टलवर करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवाकर व उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे.

"जीएसटी' करप्रणाली एक जुलै 2017पासून अमलात येणार, असे सांगितले जात असल्याने त्यासाठीची नोंदणी करायला वेळ कमी राहिलेला आहे. करदात्यांच्या या संदर्भात काही समस्या असतील तर त्या जाणून घेण्यासाठी सेवाकर आणि उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. सेवाकर, उत्पादन शुल्क अथवा विक्रीकर (व्हॅट) यामध्ये नोंदणी असणाऱ्या करदात्याने आपली नोंदणी "जीएसटी'मध्ये करणे आवश्‍यक आहे. यासाठी सेवाकरदात्याने "एसीईएस' या संकेतस्थळावर जाऊन आपला "यूजर आयडी' आणि "पासवर्ड' टाकून "जीएसटी'साठी प्रोव्हिजनल आयडी आणि प्रोव्हिजनल पासवर्ड प्राप्त करायचा असतो. त्यानंतर "जीएसटी'च्या संकेतस्थळावर जाऊन स्थलांतरित (मायग्रेट) व्हावे लागणार आहे. तसे केल्यास "जीएसटी' करप्रणाली सुरू झाल्यावर संबंधित व्यावसायिकाला विनाविलंब, विनाअडथळा व्यवसाय चालू ठेवता येणार आहे.

ज्या व्यावसायिकांनी अद्याप असे स्थलांतर केलेले नाही, अशांची माहिती सरकारने गोळा केली आहे. त्यांचा प्रोव्हिजनल आयडी आणि प्रोव्हिजनल पासवर्ड तयार केला आहे. ही माहिती लिफाफ्यात बंदस्वरूपात त्या-त्या व्यावसायिकास देण्यात येणार असून, त्यानुसार त्यांनी स्थलांतरण करावे, असे आवाहन पुण्याचे सेवाकर आयुक्त एन. श्रीधर यांनी केले आहे. या संदर्भात काही समस्या असल्यास उत्पादन शुल्क कार्यालय (आईस हाउस, पुणे) येथे भरणाऱ्या मेळाव्यात येऊन आपले काम करून घ्यावे, असे नमूद करून ते म्हणाले, की एकदा "जीएसटी' सुरू झाल्यावर नोंदणी करणाऱ्यास नवा करदाता मानले जाईल व आधी दफ्तरी असणारा करपरतावा त्याला घेता येणार नाही, हे ध्यानात घ्यावे.

Web Title: service tax department campaign for gst registration