सर्पमित्राची दहा वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा 

रवींद्र जगधने 
रविवार, 8 जुलै 2018

पांचाळ राज्य सरकारच्या वन विभागात वनरक्षक या पदावर काम करत असून, त्यांना वन विभागाकडून सर्पमित्राचे ओळखपत्रही देण्यात आलेले आहे.

पिंपरी (पुणे) : आजोबांनी सुरू केलेली वारीची परंपरा पुढे चालवत लक्ष्मण पांचाळ हा सर्पमित्र दहा वर्षांपासून विठू माउलींची पायी वारी करत आहे. ठिकठिकाणी मुक्कामाला थांबलेल्या दिंडी परिसरात अनेकदा साप आढळतात. मात्र, पांचाळ यांना कळवताच सापाला पकडून ते जंगलात सोडण्याचे काम करत आहेत. 

पांचाळ राज्य सरकारच्या वन विभागात वनरक्षक या पदावर काम करत असून, त्यांना वन विभागाकडून सर्पमित्राचे ओळखपत्रही देण्यात आलेले आहे. पहिल्यांदा वारी केल्यानंतर आलेल्या अनुभवामुळे ते दरवर्षी सुटी टाकून वारी करतात तसेच ते चांगले पखवाज वादकही आहेत. संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्यात हराळे महाराज दिंडी क्रमांक एकमध्ये सहभागी होतात, त्यांचा मोबाईल क्रमांक विविध दिंड्यांमधील अनेकांकडे असल्याने साप आढळल्यास त्यांना वारकरी संपर्क करतात. तसेच ते इतर दिंडीतील वृद्धांना, कोणाला गरज भासल्यास मंडप बांधणे व इतर मदतही करत असल्याचे काही वारकऱ्यांनी सांगितले. पांचाळ यांचे भीमा कोरेगाव येथे चांगले घर असतानाही ते वयोवृद्ध सासू-सासऱ्यांना आधार देण्यासाठी चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत राहत असून, ते दररोज शिरूर ते चिंचवड असा प्रवास दुचाकीवरून करतात. 

दिंडी मुक्कामाला थांबताना जागा चांगल्या असतीलच असे नाही. अनेकदा रानात दिंडीची राहुटी पडते. त्या वेळी विषारी-बिनविषारी साप आढळतात. वारीच्या संपूर्ण प्रवासात साधारणपणे 20 ते 25 साप पकडून जंगलात सोडतो. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांतील अनेकांकडे मोबाईल नंबर असल्याने ते तत्काळ संपर्क साधतात. - लक्ष्मण पांचाळ, सर्पमित्र
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The service of Warkaris for the last ten years by sarpamitra