दिव्यांगांचे रेशीमबंध जुळवणारी ‘सेवा मित्र फाउंडेशन’

गेल्या नऊ वर्षांपासून सेवा मित्र मंडळातर्फे ‘लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थे’तील नेत्रहीन व दिव्यांग मुला मुलींचा विवाह सोहळा पार पाडत आहे.
Divyang Marriage
Divyang MarriageSakal
Summary

गेल्या नऊ वर्षांपासून सेवा मित्र मंडळातर्फे ‘लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थे’तील नेत्रहीन व दिव्यांग मुला मुलींचा विवाह सोहळा पार पाडत आहे.

पुणे - बॅण्डबाजासह निघणारी वरात... नातेवाइकांची कमी भासू न देणारी मित्र मंडळी... सभोवताली आपुलकीने जमलेल्या आप्तेष्टांची लगबग... स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते घरसंसारात लागणाऱ्या साहित्यापर्यंत सजविलेले रुखवत... आणि त्यात वधू-वराला मिळणारा आशीर्वाद. लग्न सोहळ्याचा असा अनुभव दिव्यांगांच्या आयुष्यात क्वचितच पाहायला मिळतो. पुण्यात सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून जुळताहेत दिव्यांगांचे रेशीमबंध...

गेल्या नऊ वर्षांपासून सेवा मित्र मंडळातर्फे ‘लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थे’तील नेत्रहीन व दिव्यांग मुला मुलींचा विवाह सोहळा पार पाडत आहे. ही लग्ने थाटात होतात. साखरपुडा, हळद, मेहंदी अशा सर्व सोहळ्यांचे आयोजन करत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरले जात आहेत. अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत सुखाचा संसार करण्यासाठी अशा जोडप्यांना बळ दिले जात आहे. याबाबत सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात हक्काचा जोडीदार असावा, जीवनाच्या प्रवासात प्रत्येक सुख-दुःखात त्याची साथ असावी, एकमेकांची काळजी करण्याचा अधिकार ही भावना सगळ्यांना असते. ती भावना सामान्यांप्रमाणे दिव्यांगांच्या ही मनात उद्भवते. कित्येक असे दिव्यांग व नेत्रहीन आहेत ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा अनाथ असल्यामुळे लग्न होत नाही. अशा दिव्यांगांच्या रेशम बंध जुळविण्याचे ठरविले. २०१४ पासून या कार्याची सुरवात झाली. त्यावेळी सर्वात प्रथम लुई ब्रेल संस्थेच्याच संस्थापकांचे म्हणजेच नूतन होळकर आणि अर्जुन केंद्रे यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर प्रत्येक वर्षी अशा दोन जोडप्यांचे लग्न करत आहोत.’

मला आई-वडील नसून सध्या मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सेवा मित्र मंडळाच्या वतीने २०१८ मध्ये आमचे लग्न झाले. संस्थेमुळे नव्या आयुष्याची सुरवात झाली. स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझे लग्न अशा पद्धतीने होईल. लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमात एकाही गोष्टीची उणीव भासली नाही. या उपक्रमामुळे माझ्या सारख्या कित्येक दिव्यांगांना त्यांच्या जीवनाचा जोडीदार मिळत आहे. तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात आम्हाला देखील आनंदाने जगता येत आहे.

- मंदा ढगे, दिव्यांग, चंद्रपूर

असा होतो विवाह

  • लुई ब्रेल संस्थेमार्फतच जोडप्यांची निवड केली जाते

  • संस्थेतील मुले-मुलीच स्वतःचे जोडीदार निवडतात

  • अशा जोडप्यांच्या लग्नाची जबाबदारी मंडळ उचलते

  • नागरिकांच्या सहभागातून संसारासाठी साहित्याची भेट

  • आतापर्यंत १३ दिव्यांग जोडप्यांचे विवाह पार पडले

चहाचा व्यवसाय त्यात दिव्यांग असल्याने आपलाही संसार थाटेल का, हा प्रश्‍न नेहमी पडत होता. पण माझ्या विवाहाची सगळी जबाबदारी संस्थेने उचलली. आमच्या संसारासाठी उपयुक्त सर्व साहित्य भेट दिल्याने घरात केवळ सुखच नांदत आहे.

- रामलंग चलवदी, दत्तवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com