बारामतीच्या चारा छावण्यांची साडेसात कोटींची थकबाकी

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

टंचाईचा सामना करताना उभारलेल्या चारा छावण्यांचे बारामती तालुक्‍यातील विविध संस्थांची जवळपास साडेसात कोटी रुपये सरकारकडे थकबाकी आहे.

रक्कम त्वरित देण्याची संबंधित संस्थांची मागणी

बारामती शहर (पुणे) : टंचाईचा सामना करताना उभारलेल्या चारा छावण्यांचे बारामती तालुक्‍यातील विविध संस्थांची जवळपास साडेसात कोटी रुपये सरकारकडे थकबाकी आहे.

टंचाईच्या काळात तालुक्‍यातील विविध संस्थांनी चारा छावण्या उभारल्या होत्या. या छावण्यांमध्ये 18 हजार 230 जनावरे दाखल करण्यात आली होती. यंदा पावसाने ओढ दिल्याने सप्टेंबर अखेरपर्यंत या छावण्या सुरू ठेवण्याची परवानगी सरकारने दिली होती. मात्र, कोट्यवधींची बिले अडकून पडल्याने आता संस्था अडचणीत आल्या आहेत. यात माळेगाव, सोमेश्‍वर कारखान्यांसह बारामती तालुका दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, धो. आ. सातव ऊर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. यामध्ये सातव ट्रस्टचे 38 लाख, माळेगाव कारखान्याचे 1 कोटी 87 लाख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे 64 लाख, दूध संघाचे अडीच कोटी, सोमेश्‍वर कारखान्याचे तीन महिन्यांचे अडीच कोटी रुपयांचे बिल येणे बाकी आहे. ही बिले लवकर मिळावीत, अशी अपेक्षा या संस्थांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven and a half crores outstanding with the Government of Baramati fodder camps