सात वाहक, दोन चालक बडतर्फ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - तिकिटांच्या रकमेचा अपहार, बस वेळेपूर्वी मार्गावर सोडणे, मद्यपान करून ड्यूटी करणे, बसचे चाक पंक्‍चर झाल्याची खोटी माहिती देणे, आगारातील भंगार साहित्याची चोरी आदी विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या सात वाहक (कंडक्‍टर) आणि दोन चालकांना (ड्रायव्हर) पीएमपी प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत बडतर्फ केले. 

पुणे - तिकिटांच्या रकमेचा अपहार, बस वेळेपूर्वी मार्गावर सोडणे, मद्यपान करून ड्यूटी करणे, बसचे चाक पंक्‍चर झाल्याची खोटी माहिती देणे, आगारातील भंगार साहित्याची चोरी आदी विविध तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या सात वाहक (कंडक्‍टर) आणि दोन चालकांना (ड्रायव्हर) पीएमपी प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत बडतर्फ केले. 

पीएमपीमधील बेशिस्त दूर करण्यासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध आलेल्या तक्रारींबाबत चौकशी करून कारवाई सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या नऊ कर्मचाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत बडतर्फीची कारवाई करण्यात आली. प्रामाणिक कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई, अशी भूमिका यापुढील काळात असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

बस पंक्‍चर झालेली नसताना खोटी माहिती प्रशासनाला दिल्याबद्दल संदीप रणदिवे आणि मार्गावर असताना मद्यपान केल्याबद्दल नरेंद्र भाट या दोन्ही वाहकांना बडतर्फ करण्यात आले. मार्गावरील रोकड जमा करताना 533 रुपयांचा कमी भरणा करणारा वाहक बाळासाहेब काटे याच्या खिशात पाच हजार रुपये जास्त आढळले; तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी 130 तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्याला बडतर्फ करण्यात आले. हडपसर डेपोत स्वतःची मोटार आणून तेथील भंगार साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न करताना पकडला गेलेल्या अंकुश आकाळे या चालकाला बडतर्फ करण्यात आले; 

तर दुचाकीस्वाराला बसच्या पुढील डाव्या बाजूने धडक देऊन गंभीर जखमी केल्याबद्दल अशोक घुले या चालकाला बडतर्फ करण्यात आले. 

मार्गावर वेळेच्या सुमारे 20 मिनिटे आधी बस रवाना केल्याबद्दल साहेबराव कांबळे या वाहकाला बडतर्फ करण्यात आले; तर विनोद सोंडेकर, चंद्रशेखर गजरे, सुरेश ननावरे या वाहकांनाही प्रवाशांच्या विविध तक्रारींवरून निलंबित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नेमकी तक्रार दिल्यास कारवाई वेगाने 
पीएमपीचे चालक आणि वाहक, यांची बेशिस्त वागणूक निदर्शनास आल्यास प्रवाशांनी 020-24503355 किंवा 9881495589 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तक्रार करताना बसचा क्रमांक आणि वेळ, याची नेमकी माहिती दिल्यास कारवाई वेगाने होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक तिकिटावर तक्रारनिवारण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आहे, असेही प्रशासनाने निदर्शनास आणले आहे. 

Web Title: Seven conductor two drivers