कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता 

congress
congress

पुणे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सात नगरसेवकांचे पक्षांतर व दोन नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात असल्यामुळे शहर कॉंग्रेसला धक्का बसला आहे. यामुळे पक्ष संघटनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पक्षाला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागेल, अशी शक्‍यता असल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. 

अभिजित कदम, सुनीता गलांडे, सुनंदा गडाळे, रईस सुंडके, शीतल सावंत, अश्‍विनी जाधव या नगरसेवकांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यातील कदम, गलांडे, सावंत, गडाळे भाजपच्या, तर सुंडके, जाधव हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. नगरसेवक सनी निम्हण हेही सध्या फक्त तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसमध्ये आहेत. 

याशिवाय पक्षाचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, पदाधिकारी हरिदास चरवड यांनीही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच प्रभाग स्तरावरील अनेक कार्यकर्ते भाजप किंवा अन्य पक्षांच्या वाटेवर आहेत. मिलिंद काची यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन पक्षावरील दबाव वाढविला आहे, तर माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांच्या भूमिकेकडेही पक्षाचे लक्ष आहे. 

या पक्षांतरामागे भाजपचा वाढता प्रभाव, हे प्रमुख कारण असले, तरी तेच एकमेव कारण नसल्याचे पक्ष संघटनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. शहरात सर्वसंमत एकमुखी नेतृत्व नसल्यामुळे काही इच्छुकांना निवडणुकीबद्दल धास्ती वाटत आहे. तसेच यंदाची निवडणूक चार सदस्य पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना तोलामोलाचे सहकारी मिळतील का? याबद्दलही साशंकता आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे पक्षांतर होत आहे. काही प्रभागांतील रचना निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवकांना प्रतिकूल झाली आहे. चार सदस्यांमध्ये अन्य पक्षांचे आव्हान तुल्यबळ असल्यामुळे वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याची मानसिकताही काही जणांमध्ये निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच पक्षात गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. तसेच निवडणूक जिंकू शकेल, असा विश्‍वास असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून किती "पाठबळ' मिळेल, याबद्दलही साशंकता आहे. त्यामुळेही पक्षांतराचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबतही अनिश्‍चितता 
कॉंग्रेसच्या चिन्हावर 28 नगरसेवक गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. महापालिका पोटनिवडणुकीत लक्ष्मी घोडके आणि रईस सुंडके निवडून आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली होती. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यावर झालेल्या पक्षांतरामुळे इच्छुक आणि कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी होणार किंवा नाही, याबद्दलही अनिश्‍चितता आहेच. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जागा देईल का, याची खात्री नसल्यामुळेही सुरक्षित मार्ग शोधण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाही परिणाम पक्षावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागांसाठी सुमारे 650 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. शहरातील सर्वच प्रभागांत कॉंग्रेसचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. पक्ष संघटनेत अनेक तुल्यबळ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नगरसेवकांचे पक्षांतर झाले, तरी कार्यकर्ते असल्यामुळे पक्ष संघटनेला फरक पडणार नाही. आम्ही नव्या दमाच्या आणि चांगली शैक्षणिक पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांना संधी देणार आहोत. त्यामुळे महापालिकेत चांगल्या जागा मिळणारच आहेत. तसेच पक्षांतर करून संधिसाधूपणा करणाऱ्यांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील. 
-रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंगेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com