सात कोटींची फसवणूक;चार वर्षानंतर दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - गुंतवणुकीवर दरमहा 7 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 6 कोटी 78 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुमारे चार वर्षानंतर दोघांना अटक केली. शरद व्यंकटेश कुलकर्णी (वय 44), प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (44, दोघे रा. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांची 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

या प्रकरणी आशुतोष कुलकर्णी (रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा 2012 मध्ये घडला असून या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी जून 2014 मध्ये प्रसाद प्रभाकर वाळवेकर (रा. धनकवडी) यास अटक केली होती. या तिघांसह मनोहर पिराजी मंडपाळे (रा. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपी हे "साई एक्‍स्पोर्ट' या कंपनीचे भागीदार आहेत. त्यांनी दुबई येथील व्यापाऱ्याची फळे, भाजीपाला निर्यातीची मोठी "ऑर्डर' मिळाली असल्याचे फिर्यादीला सांगितले. या व्यवसायाकरिता भांडवल कमी पडत असल्याचे सांगून गुंतवणूक करण्याचे आणि त्यावर परतावा देण्याचे आश्‍वासन दिले. फिर्यादी आणि इतरांकडून आरोपींनी सुमारे 6 कोटी 78 लाख 50 हजार रुपये घेतले. मूळ रक्कम आणि परतावाही त्यांनी दिला नाही.

या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वाळवेकरला अटक केली. कुलकर्णी आणि चव्हाण यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. आणखी एका आरोपीला अटक करायची असल्याने आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: Seven crore fraud; four years later arrested