पीएमपी डेपोंसाठी सात कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

कात्रज तलावासाठी राखून ठेवलेला 75 लाख आणि स्वागत कमानींसाठीचा 40 लाखांच्या निधीचे बोपोडीतील नेत्र रुग्णालयासाठी वर्गीकरण करण्याचा ठराव मनसेच्या विरोधामुळे सर्वसाधारण सभेने वगळला. कात्रज तलावात सुरू असलेल्या कामांच्या निधीचे वर्गीकरण करण्यास वसंत मोरे, बाबू वागस्कर, कमल व्यवहारे यांनीही विरोध केला. त्यामुळे हा ठराव वगळण्यात आल्याचे सभागृहनेते बंडू केमसे यांनी सांगितले. 

सर्वसाधारण सभेचा निर्णय; पायाभूत सुविधा अन्‌ नव्याने डेपो उभारणार

पुणे - पीएमपीच्या अस्तित्वात असलेल्या डेपोंत पायाभूत सुविधांची कामे करणे, नव्याने डेपो निर्माण करणे आदींसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सात कोटी रुपयांचा निधी सोमवारी मंजूर केला.

कात्रज, हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि पुणे स्टेशन येथील पीएमपी आगारांतील पायाभूत सुविधांमध्ये वाढ; तसेच अपर इंदिरानगर, कोथरूडच्या कुंबरे पार्कमध्ये आगारांची नव्याने उभारणी करायची आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केला होता. सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिली.

मेट्रोसाठी तरतूद केलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. त्याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता; परंतु मेट्रोसाठी वापरली न जाणारी तरतूद यासाठी वापरण्यात येणार असून, मेट्रोला मंजुरी मिळाल्यावर त्यासाठीचा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे, असे आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले होते. दरम्यान, मेट्रोला मंजुरी मिळण्यावरून सभागृहनेते बंडू केमसे आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्यात चकमक झाली. त्यानंतर सहमतीने हा ठराव मंजूर झाला.

16 कोटींची वर्गीकरणे पुढे ढकलली
शिवसृष्टीसाठीचे पाच कोटी आणि रस्ते पूर्ववत करण्याच्या कामासाठी केलेल्या 11 कोटी रुपयांच्या तरतुदीचे विविध प्रभागांतील विकासकामांसाठी वर्गीकरण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने एक महिन्यासाठी पुढे ढकलला. मेट्रोसाठीची तरतूद विकासकामांसाठी कशी काय वापरली जाऊ शकते, असा प्रश्‍न करून मेट्रोची तरतूद कोथरूडमधीलच नगरसेवकांना द्या, अशी मागणीही करण्यात आली. त्यावरून गोंधळ झाला. विशिष्ट नगरसेवकांच्याच प्रभागांना झुकते माप दिले जाते, असाही आरोप झाला. त्यामुळे उपमहापौर मुकारी अलगुडे आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी हा विषय एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची सूचना केली आणि सभागृहाने ती मंजूर केली.

Web Title: seven crore granted for PMP depo