शिरूरमध्ये कोरोनाची पु्न्हा उचल, आणखी सात रुग्णांची भर

corona1
corona1

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यात कोरोनाने काल थोडी विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा उचल खाल्ली. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेवर गेला असताना तळेगाव ढमढेरे येथील एका ज्येष्ठचा मृत्यू झाल्याने शिरूरकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. आज दिवसभरात शहरात दोन, तर तालुक्यात पाच बाधित आढळल्याने आरोग्य विभाग व प्रशासनाची धावपळ उडाली.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला तोंड देणाऱ्या शिरूर तालुक्याला काल काहिसा दिलासा मिळाला होता. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या सणसवाडी येथील बाधितांची संख्या ३५ झाली असून, काल एका कामगाराचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्यानंतर आजही एक कामगार बाधित झाला. २४ मार्चला तालुक्यातील पहिला कोरोनाचा रुग्णही सणसवाडीतच आढळला होता. त्यामुळे सणसवाडीतील कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेत नसल्याने आज प्रशासनाने सणसवाडीसंदर्भात गांभीर्याने पावली उचलली. सणसवाडीसह शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील कोरोनाबाधितांचा वेग अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाउन, कर्फ्यूबाबत शासनस्तरावर विचारविनीमय चालू असल्याचे समजते.

शिरूर शहरात काल एका तरुण वकिलाला, तर आज एका शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली. या दोघांच्या संपर्कातील २५ जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले असून, पाच दिवसांनंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले जातील, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, उरळगाव, पाबळ व बाफना मळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असून, पाबळचा शेतकरी वगळता इतर सर्व बाधित हे कामगार असून, विविध कंपन्यांत कामाला आहेत. त्यामुळे कोरोनाचे कामगार कनेक्शन तालुक्याला घातक ठरत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. तालुक्यात आज एकूण बाधितांची संख्या १५६ झाली असून, त्यातील किमान साठजण हे कामगार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.                           

शिरूर तालुक्याच्या विविध भागांतून जवळपास दीडशे जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. त्यातील शंभर जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून,  ४४ जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट उद्या प्राप्त होतील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले.  
 
Edited by : Nilesh Shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com