राहणीमान सर्वेक्षणात सात हजार सहभागी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शहरातील शाळा, महाविद्यालये, मॉल, गर्दीची ठिकाणे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून, रिक्षांसह विविध ठिकाणी जाहिरात केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

पिंपरी - केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरविकास मंत्रालयाने महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे राहणीमान सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिकेने एक फेब्रुवारीपासून सर्वेक्षण सुरू केले असून, आत्तापर्यंत सात हजार ४०० नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. किमान २० हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण केले जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या राहणीमानासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाने देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज आणि शहराचे हवामान, याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्‍चित केला जाणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, अपेक्षांची पूर्तता, प्रशासनाचे कामकाज, निर्णय व विकासकामांची अंमलबजावणी, याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे, प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणे, हेसुद्धा सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. देशातील शहरांचा प्रगती अहवाल जूनमध्ये घोषित केला जाणार असून, तो तीन प्रकारांमध्ये असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven thousand participants in the living survey