शहरात सात हजार ज्येष्ठ एकाकी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

आपण काय सुचवाल? 
अवाढव्य वाढणाऱ्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना एकलकोंडेपणा येऊ नये, यासाठी आपण काय सुचवाल? 
आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर. 
सूचनांसाठी ट्विट करा किंवा फेसबुकवर हॅशटॅग वापरा #PuneSrCitizen 

पुणे - शहरात एकाकीपणे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका पाहणीतील आकडेवारीनुसार सध्या अशा एकाकींची संख्या सात हजारांच्या पुढे असून, गेल्या पाच वर्षांत यात सुमारे एक हजाराने वाढ झाली आहे. 

हल्ली तरुण-तरुणींचे नोकरीसाठी अन्य शहरांत किवा परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सांभाळ करण्याचा प्रश्‍न गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्यातही दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्‍तीची समस्या गंभीर होते. काही स्वयंसेवी संस्था यासाठी काही उपक्रम राबवू लागल्या आहेत. 

आमच्या संघटनेने पाच वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील "कमवा आणि शिका' योजनेतील विद्यार्थ्यांमार्फत पुणे शहरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची पाहणी केली. त्या वेळी सहा हजार एकाकी ज्येष्ठ नागरिक असल्याचे आढळले. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून, ती संख्या आता सात हजारांच्या पुढे गेली आहे. 
अरुण रोडे, मुख्य सचिव, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) 

जोडीदार गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. नातेवाईकही त्यांना त्याच अवस्थेत सोडतात. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. औषधपाणी, पेपर वाचण्यापासून ते दैनंदिन कामांसाठी त्यांना मदतीची गरज असते. ती न मिळाल्यास त्यांचे हाल होतात. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ज्येष्ठांना मदत करण्यासंदर्भात प्रबोधन करण्याची गरज आहे. 
प्रा. तेज निवळीकर, ज्येष्ठ नागरिक. 

* ज्येष्ठ नागरिकांची संख्या 
देश - 13 कोटी 
महाराष्ट्र - 1 कोटी 30 लाख 
पुणे शहर - 7 लाखांहून अधिक 
शहरातील एकाकी ज्येष्ठ नागरिक - 7000 

* ज्येष्ठ नागरिक संघ 
पुणे - 152 
महाराष्ट्र - 3 हजार 

* ज्येष्ठांसाठी पुणे पोलिसांची हेल्पलाइन 
- ज्येष्ठ नागरिक कक्ष हेल्पलाइन - 1090 

* ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या 
- जोडीदार गेल्याने असुरक्षिततेची भावना 
- संवादाचा अभाव 
- विश्‍वासपात्र लोक मिळत नसल्याची तक्रार 
- विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी मदतनिसांची आवश्‍यकता 
- नातेवाइकांकडून फसवणूक होण्याची भीती 

* अशा सोडविता येतील ज्येष्ठांच्या समस्या 
- ज्येष्ठ नागरिक संघांनी प्रत्येक ज्येष्ठांच्या घरी जाणे 
- पोलिस, नगरसेवक, त्यांच्या कार्यकर्त्यांची अडचणीच्या वेळी मदत मिळू शकते. 
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत (राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी) 
- ज्येष्ठांना सहकार्य करण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे 

Web Title: Seven thousand senior lonely people in pune city