एकोणऐंशी लाख रुपयांचा माल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पुणे - दिवाळीच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या खवा, खाद्य तेल, मिठाई अशा पदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून 79 लाख रुपयांचा माल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केला आहे. 165 ठिकाणच्या खाद्य पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

दिवाळी साजरी करताना नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध होण्यासाठी "एफडीए'तर्फे गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याची माहिती "एफडीए'चे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. 

ते म्हणाले, ""पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांतही विशेष मोहीम राबविण्यात आली. दिवाळीसाठी खवा, दुग्धजन्य पदार्थ, बेसन, आटा, रवा, वनस्पती तूप यांची मागणी वाढलेली असते. अशा वेळी भेसळ माल बाजारात येण्याचा धोका असतो. हा माल ग्राहकांपर्यंत पोचण्यापूर्वीच जप्त व्हावा, यासाठी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम पुण्यासह पुणे विभागात घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत भेसळीच्या संशयावरून 17 ठिकाणी कारवाई करण्यात आली. या बाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर या कारवाया केल्या आहेत. त्यात पनीर, बटर, खवा, लोणी, मोहरी तेल, वनस्पती तूप यांचा समावेश आहे. सुमारे दहा हजार किलो वजनाच्या या मालाची किंमत 79 लाख 61 रुपये आहे.'' 

""भेसळीच्या संशयावरून शहरातील 165 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यात सर्वाधिक नमुने मिठाई आणि खाद्य तेलाचे आहेत. त्या पाठोपाठ बेसन, आटा, रवा यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविल्याचे देसाई यांनी सांगितले. 

दीड कोटींचा माल जप्त 
पुणे विभागात एक कोटी 52 लाख 72 हजारांचा माल भेसळीच्या संशयावरून जप्त केला आहे. त्यात खाद्यतेलाचे 89, वनस्पती तुपाचे 25, दुग्धजन्य पदार्थांचे 15, खव्याचे 13, मिठाईचे 56, दुधाचे 15, रवा, मैदा, बेसनाचे 52 व इतर खाद्य पदार्थांचे 89 नमुने घेण्यात आले आहेत. 

Web Title: seventy nine Lakh seized sweets