पावसामुळे सत्तर टक्के फुलांचा चुराडा

प्रवीण डोके 
Friday, 16 October 2020

नवरात्रीनिमित्त दरवर्षी फुलांना प्रचंड मागणी असते, परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांना तुलनेने मागणी कमी आहे, तर मागील तीन- चार दिवस झालेल्या पावसामुळे विविध प्रकारच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मार्केट यार्ड (पुणे) : नवरात्रीनिमित्त दरवर्षी फुलांना प्रचंड मागणी असते, परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांना तुलनेने मागणी कमी आहे, तर मागील तीन- चार दिवस झालेल्या पावसामुळे विविध प्रकारच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी शेतकरी नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणासाठी फुलांची लागवड करतो. यंदा मात्र फुले पाण्याखाली गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फुलांचा तोडा केला आहे, त्यातील 70 टक्के फुले खराब झाली आहेत. 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेसाठी, केसांमध्ये माळण्यासाठी जुई, कागड्याचा गजरा तसेच शेवंतीच्या वेणींना बाजारात मोठी मागणी असते. यामध्ये सर्वाधिक जुईच्या गजऱ्याला सर्वाधिक पसंती असते. यामुळे जुईचे दरही अधिक असतात. यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. तरी जुईच्या फुलांना मागणी कायम आहे. घाऊक बाजारात शुक्रवारी एका किलोला 1400 ते 1600 रुपये दर मिळाला. आळंदी आणि तळेगाव परिसरातून जुईच्या फुलांची बाजारात आवक झाली आहे, तसेच घटासाठी विड्याच्या पानांचा तसेच तिळाच्या फुलांचा मान असल्याने विड्याची पाने आणि तिळाच्या फुलांचे दर तेजीत असल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

घट स्थापनेच्या आदल्या दिवशी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात फुलांचे दरही वाढतात. मात्र यंदा फुलांना मागणी कमीच आहे. शनिवारी सर्वत्र घटस्थापना केली जाणार आहे, तरी नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या वाढली नाही. यवत, माळशिरस, नगर, सातारा येथून फुलांची आवक झाली आहे. 

ऐन तोडणीच्या काळात आलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाजारात विक्रीला आलेली फुले भिजलेली आहेत. त्यातच मंदिरे बंद आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास शासनाची परवानगी नसल्यामुळे मागणी कमीच आहे. 
- अरुण वीर, अध्यक्ष, फुलबाजार आडते असोसिएशन 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसामुळे फुलांची झाडे प्रचंड प्रमाणात पडली आहेत, तर दुसरीकडे माती लागल्याने फुले खराब झाली आहेत. शेतीतील 60-70 टक्के फुलांचे नुकसान झाले आहे. 
- दीपक तरटे, शेतकरी, वाई. 

 

भिजल्याने दर्जा खालावला 

भिजलेल्या शेवंतीच्या फुलांना 50 ते 100 रुपये, तर कोरड्या आणि चांगल्या प्रतीच्या मालाला 150 ते 250 रुपये दर मिळत आहे. झेंडूच्या फुलांना 20 ते 80 रुपये भाव मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy percent of the flowers are damaged by rain