कोथिंबिर गड्डी ७० 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गावरान कोथिंबिरीच्या जुडीला सध्या २५ ते ५०, मेथीला १० ते २५ रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात कोथिंबिरीची ६० ते ७० रुपये, मेथी २० ते ३५ प्रती गड्डी भावाने विक्री होत आहे.

मार्केट यार्ड - घरातील असो की हॉटेलातील, नाश्‍त्यापासून कोणत्याही खाद्यपदार्थाची चव वाढविणाऱ्या कोथिंबिरीचे भाव सध्या कडाडले आहेत. त्यासोबतच इतर पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गावरान कोथिंबिरीच्या जुडीला सध्या २५ ते ५०, मेथीला १० ते २५ रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात कोथिंबिरीची ६० ते ७० रुपये, मेथी २० ते ३५ प्रती गड्डी भावाने विक्री होत आहे.

बाजारातील घटलेली आवक, दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आणि त्या तुलनेत जास्त असलेल्या मागणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती घाऊक व किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. 

मार्केट यार्डातील तरकारी विभागात गुरुवारी कोथिंबिरीच्या ४० हजार गड्डींची आवक झाली होती. त्या तुलनेत शहर, परिसरातून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव तेजीत आहेत. त्यातच पुणे विभागात सतत पाऊस सुरू आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये ओलसर आणि कमी दर्जाच्या शेतमालाचे प्रमाण जास्त असल्याची माहिती व्यापारी गणेश यादव यांनी दिली. 

किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, ‘‘बाजारात सध्या गुजरात येथून ‘सटाणा’ जातीच्या कोथिंबिरीची जास्त आवक होत आहे. ग्राहकांकडून गावरान कोथिंबिरीला जास्त मागणी असते. महिन्याभरात या कोथिंबिरीची आवक होईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy rupees rate per coriander