"खडकवासला'त सोडले जातेय मैलापाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात मैलापाणी आणि सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे धरणातील पाणी दूषित होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी "खडकवासला धरण पाणी शुद्धीकरण आंदोलन समिती'ची स्थापना केली असून, त्याअंतर्गत जनआंदोलन उभारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष के. डी. पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुणे - खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात मैलापाणी आणि सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे धरणातील पाणी दूषित होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी "खडकवासला धरण पाणी शुद्धीकरण आंदोलन समिती'ची स्थापना केली असून, त्याअंतर्गत जनआंदोलन उभारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष के. डी. पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

गिरिनगर येथील "मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस' (एमईएस) मार्फत प्रक्रिया न करताच धरणात सांडपाणी सोडले जात आहे. या संस्थेतील मैलापाणी व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प बंद आहे. याबाबत 30 जानेवारी 2015 ला माहिती अधिकारात माहिती मागविली असता योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे जनआंदोलन करण्याचे ठरले. यासाठी बैठक घेतली होती. त्यात समितीची स्थापना केल्याचे पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, ""एमईएसकडून सांडपाणी सोडले जात आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली असता माहिती अधिकाऱ्यांनी सिकंदराबाद कार्यालयातून माहिती घेण्याचे कळविले. त्याप्रमाणे मी सिकंदराबाद कार्यालयातून माहिती मागितल्यावर त्यांनी गिरिनगर कार्यालयातून माहिती मिळेल, असे सांगितले. गिरिनगर कार्यालयाने दिलेली माहिती अपुरी व दिशाभूल करणारी आहे. मुंबई व दिल्ली कार्यालयातूनही माहिती मागवली. पण, येथूनच योग्य उत्तर मिळाले नाही.'' 

खासदार अनिल शिरोळे यांच्यापासून ते तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना याबाबत माहिती दिली. तरीही सांडपाण्याचा प्रश्‍न कायम आहे. पुणे महापालिकेने हा प्रश्‍न आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितले. मात्र, पालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी दरवर्षी सात कोटी रुपये खर्च होतो, हे त्यांनी मान्य केले. पालिकेचे आयुक्त कुणाल कुणाल यांनाही या प्रश्‍नाबद्दल माहिती दिली. याबाबत वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली नाही. ज्या खडकवासला धरणातील पाणी पुणेकर पीत आहेत, ते दिवसेंदिवस दूषित होत आहे, त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: sewage water in khadakwasla dam