'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'

आशा साळवी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षण दिल्यास, अशा अत्याचाराचे प्रकार कमी होतील, असे निरीक्षण महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या सुमारे 90 टक्के शिक्षकांनी नोंदविले आहे. 

महापालिकेच्या अठरा माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना "लैंगिक शिक्षण - एक दृष्टिकोन' या विषयावर नेमके काय वाटते, याचा वेध सर्वेक्षणातून घेण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक प्रा. कार्तिकी सुबकडे व विभागप्रमुख डॉ. प्रा. प्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ऑफ सोशल वर्कर दीपज्योती प्रकाश यादव यांनी हे सर्वेक्षण केले. लैंगिक विषयातील शंका पालक व शिक्षकांना विचारण्याची भीती व संकोच वाटणारी मुले आकर्षणामुळे त्याचे उत्तर शोधण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात. ते टाळण्यासाठी शालेय स्तरापासूनच लैंगिक शिक्षण गरजेचे असल्याचे मत शिक्षकांनी सर्वेक्षणात नोंदविले. 80 पैकी 71 शिक्षकांनी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यास होकार दिला. सर्वेक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाला दिलेल्या प्रश्नपत्रिकेत साठ प्रश्न विचारण्यात आले होते. 

दीपज्योती यादव म्हणाल्या, की किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या वयानुरूप योग्य शिक्षण न दिल्याचे विवाहपूर्व संबंध, विवाहपूर्व गर्भपाताचे वाढते प्रमाण, पौगंडावस्थेत होणारे गुप्तरोग, असे विविध परिणाम दिसून येतात. भारतामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात बलात्काराच्या सुमारे 36 हजार गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी 462 बलात्कार हे सहा वर्षांपेक्षा लहान वयाच्या बालिकांवर झाले. सहा ते 12 वर्षे वयोगटामधील मुलींवरील अत्याचाराच्या घटना एक हजार 474, तर 12 ते 16 वर्षांच्या पाच हजार 769 मुलींवर बलात्कार झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. 16 ते 18 या वयोगटातील 8295 मुलींवर बलात्कार झाले आहेत. 

""योग्य शिक्षण दिल्यामुळे आकर्षण निश्‍चितपणे कमी होईल. शिक्षणामुळे मुला-मुलींमधील भीती, गैरसमज दूर होतील. त्यांच्यात निकोप मैत्री वाढेल.'' 
- प्रवीण शिंदे, शिक्षक 

""लैंगिकतेविषयी म्हणजे नुसती जननेंद्रियांची माहिती देणे नव्हे, तर त्यामध्ये लिंगभेद, स्त्री- पुरुष समानता, स्त्रीत्वाचा आदर यांचाही समावेश हवा. महिला मंडळांनी, संवेदनशील स्वयंसेवी गटांनी हे काम केल्यास बराच फरक पडेल. लैंगिकतेचे शिक्षण देण्यासाठी पालकांनी शालेय प्रशासनावर दबाव निर्माण केला पाहिजे.'' 
- दीपज्योती यादव

Web Title: sex education is needed at a teens age