लैंगिक अत्याचार करून चिमुरडीचा निर्घून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

अडीचवर्षीय चिमुकलीचे घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला; तसेच तिचा गळा दाबून खून केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली.

पिंपरी - अडीचवर्षीय चिमुकलीचे घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला; तसेच तिचा गळा दाबून खून केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली. 

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील कामगार वसाहतीत एका सोसायटीच्या आवारात पत्राशेडमध्ये हे कुटुंब राहते. मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास ती आई-वडिलांसमवेत झोपलेली असताना घराच्या अर्धवट उघड्या दरवाजातून आत आलेल्या आरोपीने चिमुकलीला पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतील एका नाल्यामध्ये टाकून दिला. 

दरम्यान, पहाटे झोपेतून उठल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा शोध लागत नसल्याने त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीचे कुटुंबीय व पोलिस शोध घेत असताना, राहत्या घरापासून शंभर मीटरवर चिमुकलीचा मृतदेह नाल्यात सापडला. शवविच्छेदनानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. 

पीडित मुलीचे कुटुंबीय मूळचे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील विकासखंड येथील असून, कामानिमित्त पिंपळे सौदागर येथे आले आहे. मुलीचे आई-वडील दोघेही मजुरीचे काम करतात. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual abuse Girl Murder Crime