'एसएफआय'चे घोडेगाव येथे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

आंदोलनात पुणे जिल्हयातील शिनोली, घोडेगाव, मंचर, जुन्नर, खेड तसेच पुणे शहरातील वसतीगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

घोडेगाव : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) पुणे जिल्हा समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडवण्यासाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रकल्प कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पुणे जिल्हयातील शिनोली, घोडेगाव, मंचर, जुन्नर, खेड तसेच पुणे शहरातील वसतीगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. घोडेगाव शहरातील हरिश्चंद्र मंदिरापासून ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत जल्लोष करत रॅली काढली. घोषणा देत प्रकल्प कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - एसटी चालकाचा सुटला ताबा अन.... 

आंदोलनात सहभागी झालेल्या विविध वसतिगृहाचे प्रतिनिधी व एसएफआयचे कार्यकर्ते यांचे 13 जणांच्या शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दोन तास चर्चा केली. या चर्चेमध्ये मेस ची DBT बंद करण्यासाठी, भत्यामध्ये वाढ करून 1500 रूपये करण्यासाठी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्टेशनरीची DBT वाढवण्यासाठी व शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदत वाढ करण्याचे प्रस्ताव आयुक्तांना पाठवण्याचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्य केले.

त्याचबरोबर प्रत्येक वस्तीगृहांतून आलेल्या प्रतिनिधींच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यात शिनोली, मावळ व इतर सर्व वसतिगृहातील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणार, ड्रेसकोड चे पैसे व खेळाचे साहित्य लवकरच देण्यात येईल, शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना MS-CIT चे प्रशिक्षणसाठी 8 दिवसात गृहापाल यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येणार, वस्तीगृहांमध्ये सोलर दुरुस्ती व नवीन गिझर देणार, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने लावणार असल्याचे मान्य केले आहे.

तसेच महिन्यातून दोन वेळा वसतिगृहाचे विद्यार्थी प्रतिनिधी, गृहपाल व संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक लावण्याचे प्रकल्प अधिकारी डुडी यांनी मान्य केले. तसेच या आंदोलनात JNU मधील विद्यार्थी/ शिक्षक यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

जरुर वाचा -  काळूबाईकडे निघालात...मग हे वाचाच

यावेळी आंदोलनात SFI राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, SFI पुणे जिल्हा सचिव विलास साबळे, अध्यक्ष राजु शेळके, रोहिणी नवले, संदीप मरभळ, रवी साबळे, अविनाश गवारी इत्यादी कार्यकते उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राजू घोडे यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SFI agitation at Ghodegaon