शगुन चौकात वाहतुकीचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बंद सिग्नल, बेशिस्त वाहनचालक, पार्किंग अन्‌ अतिक्रमणांचा विळखा
पिंपरी - बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, अनधिकृत वाहनतळ व अतिक्रमणांचा विळखा यामुळे येथील शगून चौकात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. महापालिका व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

बंद सिग्नल, बेशिस्त वाहनचालक, पार्किंग अन्‌ अतिक्रमणांचा विळखा
पिंपरी - बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, अनधिकृत वाहनतळ व अतिक्रमणांचा विळखा यामुळे येथील शगून चौकात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. महापालिका व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

पिंपरीतील शगुन चौक परिसरात शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. येथे कायमच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. त्यात रविवार व गुरुवारी जास्तच भर पडते. त्यामुळे चौक सतत गजबजलेला असतो. परिसरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमणे, वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनचालक यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतो. 

काळेवाडी फाटा ते पुणे-मुंबई महामार्गापर्यंत शगुन चौकातून प्रवासी रिक्षा, पीसीएमटी बस रस्त्यातच थांबविल्या जातात. तसेच एकेरी मार्ग असतानाही त्या याच चौकातून जात असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. लगतच रेल्वे स्टेशन, विविध हॉस्पिटल, शाळा असल्याने मोठी वर्दळ असते. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्था नियंत्रणाअभावी विस्कळित झाल्याचे दिसून येते. तसेच वाहतुकीचे नियम मोडणारेच जास्त असल्याने, वाहतूक कोंडी होते. दिवसा बंदी असतानाही अवजड वाहने बाजारात घुसतात. पोलिसांनी पंधरा दिवस कडक कारवाई केल्यास नागरिकांना नियम पाळण्याची सवय लागेल. असे मत व्यावसायिक महादेव श्रीमंगले यांनी व्यक्त केले.  

पोलिसांची बघ्याची भूमिका
शगुन चौकातून काळेवाडी, पिंपरीगावाकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे. मात्र रिव्हर रोडने जाणारी वाहने कराची चौकात ‘नोएंट्री’त घुसून शगून चौकात दाखल होतात. त्यामुळे एकेरी मार्गाने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा वाहतूक पोलिस नसतात. पोलिसांनी एका ठिकाणी न थांबता वाहतुकीचे योग्य नियमन करणे गरजेचे आहे, असे मत स्थानिक रहिवासी जितेंद्र जुनेजा यांनी व्यक्त केले.  

अतिक्रमणांचा विळखा
शगुन चौकातील चारही बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत असलेले दुकानदार, हातगाड्या व व्यावसायिकांनी आपापल्या दुकानातील बहुतांश माल रस्त्यावरच मांडला आहे. रस्ते अतिक्रमणांनी वेढलेले असल्याने ते अरुंद झाले आहेत. रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू, त्यात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते.

काय करायला हवे 
बेशिस्त वाहनचालकांवर नियमित कारवाई
अतिक्रमण हटवावीत
वाहतूक पोलिसांची कायमची नेमणूक 
सिंग्नलचे सुसूत्रीकरण
वाहनतळ व पदपथाची व्यवस्था 
रस्त्यावर वस्तू मांडणाऱ्या व्यापाऱ्यांना लगाम 

पिंपरी कॅम्प परिसरात बेशिस्त वाहनांवर सतत कारवाई चालू असते. मात्र अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, महापालिकेने संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. 
- रवींद्र निंबाळकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पिंपरी.

Web Title: shagun chowk traffic