'शाहीराचा डफ वाजायला लागला तर फजिती होईल...'

प्रियांका तुपे
सोमवार, 18 जून 2018

नगरसेवक अजय खेडेकर आणि माजी आमदार व इतर काही मान्यवरांनी उदघाटनाला, कार्यक्रमाला उपस्थित राहून आमची लाज राखली अशी उद्विग्न प्रतिक्रिया या परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी दिली. 

पुणे : पुण्यात आज (सोमवार) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला शासनाने पाठ फिरवली, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शाहीराचा डफ वाजायला लागला तर फजिती होईल, असा इशारा यावेळी शाहीरांनी दिला.

महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी पाठ फिरविली. सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे हेही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.

नगरसेवक अजय खेडेकर आणि माजी आमदार व इतर काही मान्यवरांनी उदघाटनाला, कार्यक्रमाला उपस्थित राहून आमची लाज राखली अशी उद्विग्न प्रतिक्रिया या परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी दिली. 

पासलकर म्हणाले, ''लोककलावंतांनी, शाहीरांनी महाराष्ट्र जगवला. मात्र त्या शाहिरांकडे ढुंकून बघायला शासनाला वेळ नाही. पण आम्हा शाहिरांचा डफ वाजायला लागला तर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. मार्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंत्र्यांना वेळ नव्हता म्हणून आम्ही पूर्वनियोजन करून, मंत्र्यांची, मान्यवरांची वेळ घेऊन जूनमध्ये कार्यक्रम ठरवला. तरीही शासनाचे प्रतिनिधी कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. महाराष्ट्रभरातून आलेल्या जवळपास 400- 500 शाहीरांना काय उत्तर द्यावं असा प्रश्न मला पडला आहे. लोककलावंतांच्या काही मूलभूत मागण्या गेली अनेक वर्षे सरकारकडे लावून धरल्या, मात्र त्याची अंमलबजावणी नाही.''

Web Title: Shahir Dada Pasalkar warn government in Pune