शाहू मोडक पुरस्‍कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे - शाहू मोडक यांच्या अभिनय कारकिर्दीचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांना मिळालेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि संस्कृतीचा संस्कार रुजवला, असे मत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले. 

पुणे - शाहू मोडक यांच्या अभिनय कारकिर्दीचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांना मिळालेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि संस्कृतीचा संस्कार रुजवला, असे मत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले. 

अभिनेते शाहू मोडक यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शाहू मोडक स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अभिनेते संजय मोने, शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक आदी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेता हा पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना, बाल कलाकार पुरस्कार आर्य अनिल आढाव याला, बाल गायिका पुरस्कार नंदिनी गायकवाड हिला, जिद्द पुरस्कार राहुल देशमुख यांना, तर ज्योतिष पुरस्कार श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांना प्रदान करण्यात आला. 

पवार म्हणाले, ‘‘बाळासाहेब भारदे आणि शाहू मोडक यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांच्यातील आध्यात्मिक चर्चा हा त्यांच्या सोबत असणाऱ्यांनादेखील समृद्ध करणारा अनुभव असायचा.  शाहू मोडक यांनी ज्ञानेश्वरांच्या भूमिकेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास केला होता.’’

बापट म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांना आयुष्य जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अडचणींवर मात करून ते कसे मार्ग काढतात याचा धांडोळा घेतला, तर त्यात विपुल साहित्य सापडू शकते. स्पर्धात्मक जगात वावरताना कोणत्याही मूल्यांची तमा न बाळगता केवळ यश हाच आयुष्याचा मंत्र मानणाऱ्या या पिढीला शाहू मोडकांसारखी उदाहरणे आदर्श ठरतील.’’

प्रभावळकर म्हणाले, ‘‘शाहू मोडकांचा प्रवास थक्क करणारा आहे. २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका करणे, तसेच डबल रोल करणे, असे नानाविविध विक्रम शाहू मोडक त्यांच्या नावावर आहेत.’’

Web Title: shahu modak award give to dilip prabhavalkar