शिरूर बाजार समितीत अखेर आंबेगावला संधी...

shirur
shirur

शिरूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आज शंकर जांभळकर यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असून, या कालावधीत दोघांना किंवा तिघांना हे पद विभागून देण्याचे अंतर्गत ठरले असून, त्यात प्रथम जांभळकर यांना संधी देण्यात आली. शिरुर बाजार समितीवर शिरुर- हवेली व शिरुर- आंबेगाव या दोन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक निवडून आल्याने पदाधिकारी निवडताना दोन्ही मतदारसंघात समतोल ठेवण्याचे अंतर्गत ठरले आहे. त्यातून आंबेगाव मतदारसंघाला संधी देण्यात आली 

शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापतिपदाच्या निवडीसाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालकांची विशेष सभा झाली. या पदासाठी जांभळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी जाहीर केले. या निवडीनंतर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नूतन सभापती जांभळकर यांचा फेटा बांधून व हार घालून सत्कार करण्यात आला. सर्व संचालक या वेळी उपस्थित होते. या निवडी नंतर सभापती जांभळकर यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पक्षाचे आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, माजी आमदार पोपटराव गावडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार; तसेच सुजाता पवार, सविता बगाटे व राजेंद्र जगदाळे हे जिल्हा परिषद सदस्य या वेळी उपस्थित होते. 

शिरुर बाजार समितीवर शिरुर- हवेली व शिरुर- आंबेगाव या दोन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक निवडून आल्याने पदाधिकारी निवडताना दोन्ही मतदारसंघात समतोल ठेवण्याचे अंतर्गत ठरले असून प्रथम आंबेगाव मतदारसंघातील जांभळकर यांना संधी देण्यात आली असल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. शिरुर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार जांभळकर यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. या वर्षी आंबेगाव मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आले असून, पुढील वर्षी शिरूर मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीच्या ताब्यातील बाजार समितीचा गेल्या तीन वर्षातील कारभार खूप चांगला व वेगवान झाला असून, शेतकरी विकासाची हीच परंपरा सर्व संचालकांना विश्वासात घेऊन अधिक वेगाने राबवून कारभाराचा नवा आदर्श निर्माण केला जाईल, असे नूतन सभापती शंकर जांभळकर यांनी या निवडीनंतर 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अशोक पवार यांची मुत्सद्देगिरी 
शिरुर बाजार समितीच्या सभापती निवडीवरुन यापूर्वी झालेल्या 'मंगल'मय घडामोडी व उलथापालथीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या निवडीकडे तालुक्याचेच नव्हे; तर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शशिकांत दसगुङे यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या महिनाभर अनेक घडामोडी घडल्या. सभापतिपद शिरुर भागाला मिळणार की आंबेगावला यावरुनही मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती.

राष्ट्रवादीतील काही असंतुष्टांनी थेट भाजपच्या संचालकांशी आतून संधान साधले होते. त्यामुळे सभापती निवडीवरुन पुन्हा गमतीजमती होणार, असे चित्र होते. गतवेळी शिरूर मतदारसंघाला सभापतिपद मिळाल्याने यावेळी ते आमच्या भागात मिळावे, अशी आग्रही मागणी आंबेगाव भागातील संचालकांनी केली होती. त्यातील काही महत्वाकांक्षी नेत्यांनी हे पद पदरात पाडून घेण्यासाठी व्यूहरचनाही आखली होती. आमदार पवार यांनी व्हेटो वापरुन पुन्हा शिरुर भागात सभापतिपद ठेवण्याचा प्रयत्न केल्यास 'भागाची अस्मिता ' जागृत करुन व विरोधी संचालकांशी हातमिळवणी करुन बंडाळी घडवण्याचा डाव मांडला होता. पण धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जाणारे आमदार पवार यांनी हे डाव वेळीच ओळखून आंबेगावला पद देण्याची उदारता दाखवताना आपल्याला नको असलेल्या व्यक्तीला खड्यासारखे बाजूला सारुन त्यांचा डाव त्यांच्या वरच उलटवला. आमदार अशोक पवार यांच्या या मुत्सद्देगिरीची चर्चा तालुकाभर आज दिवसभर चालू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com