न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : कुंजीर

Shantaram Kunjir demands legally accepted Maratha reservation
Shantaram Kunjir demands legally accepted Maratha reservation

राजगुरुनगर : ''न्यायालयात टिकेल, असे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून 26 नोव्हेंबरपूर्वी द्या; अन्यथा मराठा क्रांती मोर्चा विधानभवनाला घेराव घालणारच,'' असा इशारा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिला. 

मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे समाज जनजागृतीसाठी काढण्यात आलेली मराठा संवाद यात्रा आज राजगुरुनगर (ता. खेड) येथे पोचली. संवाद यात्रेचे आगमन आणि स्वागत झाल्यानंतर खेड बाजार समितीच्या आवारात मोर्चाच्या प्रतिनिधींनी तालुक्‍यातील समाजबांधवांशी संवाद साधला. त्या वेळी कुंजीर बोलत होते.

याप्रसंगी भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, विशाल तुळवे, वामन बाजारे, ऍड. अनिल राक्षे, शंकर राक्षे, सुदाम कराळे, कैलास मुसळे, बाळासाहेब सांडभोर, दिलीप होले, शुभम गाडगे, माणिक होरे आदी उपस्थित होते.

कुंजीर म्हणाले, ''सरकारने मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण दिले पाहिजे, म्हणजे न्यायालयात याचिका दाखल होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. मुख्यमंत्री एक तारखेचे आश्वासन देत आहेत, पण ते आम्हाला दिशाभूल करणारे वाटते. अधिवेशन चालू झाल्याने त्यांनी 26 नोव्हेंबरपूर्वी निर्णय जाहीर करून टाकावा; अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे. हे आंदोलन हिंसक होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडविल्या, तर त्याठिकाणीच आम्ही ठिय्या आंदोलन करू. समाजाच्या मागण्यांसाठी लाखो मराठा तुरुंगात जाण्यासाठी तयार आहेत. आरक्षण मिळाल्यावर आम्ही जल्लोष करणार नाही. कारण, त्यासाठी आमचे 42 जण हुतात्मा झालेले आहेत. मुंबईच्या 26 नोव्हेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.'' 

मराठा समाजाबाबत सरकारने जाहीर केलेल्या योजना आणि घोषणा प्रत्यक्षात आल्या नसल्याचे अनेकांनी समन्वयकांना सांगितले. वामन बाजारे यांनी सूत्रसंचालन केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com