पक्षांतरांसाठी तपास यंत्रणांचा धाक -शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

सध्या राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अन्य पक्षांतील नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून, पक्षात घेतले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांवर केली.

पुणे - सध्या राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अन्य पक्षांतील नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून, पक्षात घेतले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांवर केली. दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र इतर पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी वाहून घेतल्याचेही ते म्हणाले. "ईव्हीएम'वरून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका योग्य नाही, असेही पवार म्हणाले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. पवार म्हणाले, ""ईव्हीएमविरोधात राजकीय पक्ष एकत्र आले असून, राज ठाकरे यांनी "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका राज यांच्यासह मनसेच्या अन्य नेत्यांची आहे. त्यावर दोन्ही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, बहिष्काराची भूमिका योग्य नाही.'' 

""सध्या राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अन्य पक्षांतील नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून, पक्षात घेतले जात आहे. अडचणीत असलेल्या संस्थांच्या प्रमुखांना कायद्याबाहेर जाऊन आर्थिक मदत केली जात असून, पक्षांतर बंदी कायदा पाळला जात नाही. राज्यातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडून मुख्यमंत्री आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी वाहून घेतले आहे. कर्नाटकनंतर आता मध्य प्रदेश आणि राजस्थानातील सरकारे अस्थिर करण्याचा भाजपचा डाव आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना गोवण्याचा प्रयत्न झाला, असेही पवार यांनी सांगितले. आमदार शिवेंद्रराजे भोसले, राहुल जगताप, संग्राम जगताप हे राष्ट्रवादीसोबतच आहेत. तसे त्यांनी कळविले आहे, असेही पवार यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar has been criticized by the ruling party