भीमसेन यांचा मालकंस अजूनही कानात - पवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे - दिल्ली असो की बारामतीच्या घरी, पंडित भीमसेन जोशी यांना ऐकण्याची संधी मला स्वत:ला अनेक वेळा मिळाली. त्यांनी मालकंस आणि दरबारी गायला सुरवात केली की त्यांनी तासन्‌ तास गात राहावे, असे वाटायचे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

पुणे - दिल्ली असो की बारामतीच्या घरी, पंडित भीमसेन जोशी यांना ऐकण्याची संधी मला स्वत:ला अनेक वेळा मिळाली. त्यांनी मालकंस आणि दरबारी गायला सुरवात केली की त्यांनी तासन्‌ तास गात राहावे, असे वाटायचे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला पवार यांनी शनिवारी हजेरी लावली. माजी मंत्री विनायकराव पाटील, उद्योजक सतीश मगर, विठ्ठल मणियार त्यांच्या समवेत होते. खासदार अनिल शिरोळे हेही या वेळी उपस्थित होते. श्रीनिवास जोशी हे राग बिहाग आळवत असताना त्यांचे आगमन झाले. गायन झाल्यावर "भीमसेन स्टुडिओ' या यू ट्यूब चॅनेलचे उद्‌घाटन त्यांनी केले. 

पवार म्हणाले, ""पंडितजींनी 66 वर्षांपूर्वी हा महोत्सव सुरू केला. याद्वारे शास्रीय संगीताचा कान तयार करण्याचे काम केले. अनेक नवीन कलाकारांना प्रोत्साहन दिले. अनेकांना हाताला धरून येथे आणले. त्यांना संधी दिली. त्यानंतर त्या कलाकारांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील रसिकांच्या मुखात आणि कानात बसले. 

माउलींना शुभेच्छा 
श्रीनिवास जोशी यांना माउली टाकळकर टाळाची साथ करीत होते. त्यांचा उल्लेख पवार यांनी केला. ""पंडितजींपासून माउली सवाईत साथ करीत आहेत. आता तिसऱ्या पिढीलाही त्यांची साथसंगत आहे. त्यांचे वय वर्षे फक्त 92 आहे. माउली, तुम्ही वयाची शंभरी पूर्ण करावी आणि तेव्हादेखील तुम्हाला ऐकण्याची संधी आम्हाला मिळावी,'' अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

...तेव्हा तिकीट काढून, आता फुकट 
सवाईच्या जुन्या आठवणी पवार यांनी सांगितल्या. ते म्हणाले, ""मी सवाईला यापूर्वी आलो आहे. त्याला आता तीस-चाळीस वर्षे उलटून गेली. त्या वेळी तिकीट काढून यायचो. आज फुकट आलो. तिकीट काढून यायचे आणि मागे बसून ऐकायचे. त्यात वेगळा आनंद होता. आज आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही रमणबागेतून इकडे आलात आणि हा मंडप व्यापक झालेला दिसला. माझी खात्री आहे की हा मंडप आणखी मोठा करावा लागेल, अशीच परिस्थिती आहे.''

Web Title: Sharad Pawar old memories