
Sharad Pawar : शरद पवार यांचा निर्णय बारामतीकरांसाठी धक्कादायक
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आज बारामतीकारांना कमालीचा धक्का बसला. पवार साहेबांची निवृत्ती इतक्या अचानक कशी होऊ शकेल, याबाबत बारामतीकरांमध्ये चर्चा सुरू होती. अनेक कार्यकर्त्यांना या बातमीनंतर भावना अनावर झाल्या होत्या. बारामती शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमून शरद पवार यांच्या या भूमिकी विषयी चर्चा करताना दिसत होते.
पवार साहेबांना कोणीतरी थांबवायला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. आता नेमके काय करायचे हे कार्यकर्त्यांना समजत नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते संयम बाळगून होते. विरोधी पक्षनेते अजित पवार हे याबाबत काय आदेश देतात त्याची वाट शहरातील असंख्य कार्यकर्ते पाहत होते. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव म्हणाले, निवृत्तीची ही वेळ नव्हती उलट या काळामध्ये पवार साहेबांनी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्राच्या राजकारणाला सावरायला हवे, या स्थितीत राज्याच्या राजकारणाला सावरण्यासाठी त्यांच्या इतका खंबीर नेता दुसरा असू शकत नाही.
माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी काढलेला आहे आणि शेवटपर्यंत त्यांनीच तो चालविला पाहिजे. पवार साहेबां व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कल्पना देखील सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही हा निर्णय अतिशय धक्कादायक असल्याचे सांगत, साहेबांनी निवृत्ती घेतली तरी कार्यकर्त्यांच्या मनातून साहेब जाऊ शकत नाहीत ते राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे दैवत आहेत असे सांगितले.
अनेकांनी हा निर्णय अतिशय अनपेक्षित व धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नोंदवली मात्र पुढील दोन-तीन दिवस वाट बघून साहेब काय निर्णय घेतात हे पहावे लागेल असेही काही कार्यकर्त्यांनी सांगितले.