तटकरे कुटुंबीयांमधील वाद मिटला

मिलिंद संगई
मंगळवार, 17 जानेवारी 2017

तटकरे कुटुंबीयांमध्ये तीन आमदार आहेत. सुनील तटकरे, त्यांचा भाऊ अनिल हे विधान परिषद सदस्य आहेत; तर अवधूत तटकरे विधानसभा सदस्य आहेत.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांमधील राजकीय वाद मिटविण्यात ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (मंगळवार) यश आले. तटकरे यांच्यासमवेत त्यांची मुलगी आदिती, मुलगा अनिकेत आणि पुतणे अवधूत आणि संदीप यांनी सकाळी पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर दुपारी साडे बारा वाजता खुद्द पवार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

'तटकरे कुटुंबीयांमधील वाद त्यांच्या गावीच मिटला आहे. आज सगळे कुटुंबीय एकत्रपणे भेटायला आले होते. एकदिलाने काम करू, अशी ग्वाही त्यांनी मला दिली आहे. त्यांच्या एकत्र येण्याचे राजकीय परिणाम येणाऱया निवडणुकांमध्ये दिसतीलच,' असे पवार यांनी सांगितले. 

सुनील तटकरे म्हणाले, की आमच्या कुटुंबात कोणताही वाद राहिलेला नाही. आमच्या कुटुंबामध्ये काही समज-गैरसमज होते. शरद पवार यांनी समोर बसवून ते मिटविले आहेत. आता कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. पुढच्या काळातही एकत्रच राहणार आहोत.

तटकरे कुटुंबीयांमध्ये तीन आमदार आहेत. सुनील तटकरे, त्यांचा भाऊ अनिल हे विधान परिषद सदस्य आहेत; तर अवधूत तटकरे विधानसभा सदस्य आहेत. राज्यात सुरू असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंबीयांमधील वाद मिटविणे राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्वाचे होते. 

सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या रोहा नगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने संदीप यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. राष्ट्रवादीने संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले. निवडणुकीत अवघ्या सहा मतांनी पोटफोडे विजयी झाले. बंडखोरी केलेले संदीप तटकरे तिसऱया स्थानावर राहिले. 

Web Title: sharad pawar solve disputes between tatkare brothers