पवारांबद्दल पुणेकर कधीच मेहेरबान नाहीत

पवारांबद्दल पुणेकर कधीच मेहेरबान नाहीत

पुणे - क्‍लब ऑफ महाराष्ट्र, काका कुवा मॅशन, गोखले हॉल, स. प. महाविद्यालय, काँग्रेस भवन अशा अनेक वास्तू पुणे आणि पुण्याबाहेर उभारणारे वास्तूतज्ज्ञ नरहर गणपत पवार यांचा दाखला देऊन, ‘पुणेकरांनी पवारांबद्दल मेहेरबानी कधीच दाखविली नाही,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी खंत व्यक्त केली. पुण्यात कधी निवडणूक लढवावीशी वाटली नाही का, या प्रश्‍नाला, ‘आता निवडणूक नाही,’ असे सांगत निवडणूक लढविणार नसल्याचा पुनर्उच्चारही त्यांनी केला.

निमित्त होते ‘पेपर लिफ’च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे. पुण्यात शिक्षणासाठी असताना शहरातील सर्व महाविद्यालयांच्या निवडणुका आम्ही कशा जिंकायचो, हे सांगताना आपल्या बावन्न वर्षांच्या राजकीय कारर्किदीचा हा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी पवार यांच्या हस्ते ‘पुणे एकेकाळी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, मंदार लवाटे, जतन भाटवडेकर आदी उपस्थित होते. ‘आठवणीतील पुणे’ या विषयावर गप्पा मारताना कॉलेज जीवनातील किस्से, गदिमांशी असलेली जवळीक, हिराबाई बडोदेकर, गजानन वाटवे यांचे गाणे, पाहिलेली नाटके येथपासून ते गुडलकमधील कशीम शेखचा खिमा, प्रभाचा वडा, मंडई कट्ट्यावरील रात्रीचा चहा, अशा अनेक गोष्टींना पवार आणि श्रीनिवास पाटील यांनी उजाळा दिला. पुण्यात अनेक वास्तूंना मोठा इतिहास आहे. राज्याचा नव्हे, तर देशाच्या अलीकडच्या आणि पूर्वीच्या काळाचा इतिहास त्यातून सांगता येईल, 

असे सांगून पवार म्हणाले, ‘‘पुणे शहर हे देशातील एक महत्त्वाचे शहर आहे. विद्येचे माहेरघर, औद्यागिक नगरी, आयटी हब अशा अनेक गोष्टींनी हे शहर ओळखले जाते. अमेरिकेतील ड्रेट्राईड हे शहर जसे ओळखले जाते, तसे देशातील पुणे हे ड्रेट्राईड आहे. आज या शहरात प्रचंड बदल झाला आहे.’’

तेच गृहस्थ झाले आजेसासरे
कॉलेज काळातील आठवणी सांगताना पवार म्हणाले, ‘‘पानशेतनंतर पुणे शहराची पुन्हा उभारणी करण्यासाठी काँग्रेसने स. गो. बर्वे यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार आम्ही करत होतो. प्रभात रस्त्यावरील एका घरी गेलो. दोन ते तीन वेळा बेल वाजविल्यानंतर दरवाजा उघडला. दुपारचे दोन वाजले होते. तेव्हा सर्वांत पहिला प्रश्‍न आला, ही वेळ आहे का ? हे घर काँग्रेसचे नाही,’ असे सांगून आम्हाला बाहेर काढले. सुदैवाने पुढे तेच गृहस्थ माझे आजेसासरे झाले.’’

पुन्हा येईन, तर सभागृहातच
मुंबई कधी पाहिली नव्हती, म्हणून पाच- सहा मित्रांबरोबर पहिल्यांदा तिथे गेलो. दुष्काळी भागातून आल्यामुळे समुद्र पाहिला. विमानतळ आणि विधान सभेतही गेलो. विधानसभेतील गॅलरीमध्ये पायावर पाय टाकून बसलो होतो. तेव्हा तेथील शिपायाने मला हटकले. पुन्हा तीच चूक माझ्याकडून झाली. शेवटी त्याने बाहेर काढले. तेव्हा बाहेर पडताना, त्याला एवढेच म्हणाले, ‘‘पुन्हा येईन, तर सभागृहातच येईन.’’ पवारांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com