
Pune News : अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा घडविणार; शरद पवार
पुणे : अल्पसंख्याक समुदायाच्या महत्त्वपूर्ण व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाला दिले.
अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकाराची हमी, त्यांच्यावर होणारे हल्ले, लोकप्रतिनिधित्व आणि अर्थसंकल्पात किमान २० टक्क्यांची तरतूद यासह अल्पसंख्याकांसाठी किमान समान संधी उपलब्ध करुन द्यावी, या प्रलंबित प्रश्नांबाबत पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १६ मार्च रोजी विशेष बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पवार यांनी अल्पसंख्याकाच्या प्रश्नांबाबत सहमती दर्शवत त्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात ख्रिस्ती धर्मगुरू थॉमस बिशप डाबरे, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक अब्दुर रहेमान, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष लुकस केदारी, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पिरजादे, जुबेर मेमन, अल्ताफ पिरजादे, फादर मायकल सहभागी होते.
अब्दुर रहेमान यांनी अल्पसंख्याकांना भेडसावणारे प्रश्न व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. बिशप डाबरे यांनी धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा अंगीकार करण्यासाठी आपण विशेष मोहीम घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना संविधानाने दिलेले अधिकार मिळवून देण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत डॉ. धेंडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अल्पसंख्याकाच्या प्रश्नांबाबत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी (एनसीएम) च्या वतीने देशभर कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दिल्ली येथे सर्व पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींचे याच मुद्यांवर राष्ट्रीय संमेलन घेण्यात येणार असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.