सहकाराबाबतचा दृष्टिकोन बदलावा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

उरुळी कांचन - राज्य सरकारचा सहकार चळवळ व संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने, अनेक चांगल्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, सरकारने आपला दृष्टिकोन बदलावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

उरुळी कांचन - राज्य सरकारचा सहकार चळवळ व संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने, अनेक चांगल्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, सरकारने आपला दृष्टिकोन बदलावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव सांगता सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत  पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते,  निसर्गोपचार ग्रामसुधार केंद्राचे विश्वस्त डॉ. एन. जी. हेगडे, ज्ञानोबा कांचन, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, यांच्यासह या कार्यक्रमाचे संयोजक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. 

पवार म्हणाले, सहकार चळवळीमुळेच महाराष्ट्र व गुजरात आर्थिकदृष्ट्या आजपर्यंत आघाडीवर राहिले. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, दूधसंस्था, बॅंका, पतपेढ्या उभ्या राहिल्याने त्या भागाचा विकास झाला हे सत्य कोणालाही नाकारून चालणार नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या संस्थाही अडचणीत येऊ लागल्या आहेत.या संस्था अडचणीत आल्यास सर्वसामान्य जनता अडचणीत येणार आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना सरकारने वठणीवर आणावे, मात्र चांगल्या संस्थांकडे चांगल्याच नजरेने पाहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

प्राप्तिकराचा प्रश्‍न संसदेत मांडणार...
सहकारी संस्थांच्या उत्पन्नावर संपूर्ण देशात प्राप्तिकर (इनकम टॅक्‍स) माफ असताना, पुणे जिल्ह्यातील संस्थांकडून वसुली केली जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यासंदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sharad Pawar Talking