जेव्हा शरद पवार रमतात जुन्या आठवणींमध्ये...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

जुन्या स्मृतींना उजाळा देत नाही, असा माणूस मिळणे विरळच...

बारामती : जुन्या स्मृतींना उजाळा देत नाही, असा माणूस मिळणे विरळच...माणसे जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर गेली तरी त्या स्मृतींना नकळतपणे उजाळा मिळतच असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार हेही आपलीच काही दुर्मिळ छायाचित्रे पाहून जुन्या काळात रमले होते. प्रसंग होता बारामतीचे ज्येष्ठ छायाचित्रकार गंगाधर काळे (नाना) व शरद पवार यांच्या भेटीचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शरद पवार यांचे राजकारण सुरु झाले 1967 च्या निवडणुकीपासून आणि काळे यांचा छायाचित्रांचाही व्यवसाय त्याच वर्षी सुरु झाला. गेल्या जवळपास पाच दशकांमध्ये शरद पवार यांचे असंख्य फोटो त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या जुन्या छायाचित्रांचा संग्रह करण्याचे काम सुरु केले आहे. या निमित्ताने जेव्हा गंगाधर काळे यांच्याकडील फोटोंचा खजिना सुप्रिया सुळे यांनी पाहिला तेव्हा त्याही अचंबित झाल्या. शरद पवार बारामतीत येतील तेव्हा एकदा या दोघांची भेट घडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

Sharad_Pawar

शरद पवार व गंगाधर काळे हे सुपरिचित. त्यामुळे दोघांनीही हा प्रस्ताव मान्य करत काल ही एक आगळीवेगळी भेट झाली. शरद पवार यांच्याकडे जाताना नाना काळे निवडक 50 दुर्मिळ फोटो घेऊन गेले. हे फोटो पाहताना साहजिकच शरद पवार जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. प्रत्येक फोटोच्या मागे त्या फोटोचा तपशील व सालही त्यांनी आवर्जून लिहिले होते. पण शरद पवारांची स्मरणशक्तीच एवढी अफाट होती, की एकाही फोटोच्या मागील तपशील पाहायची वेळच त्यांच्यावर आली नाही, त्यांनी अगदी अचूकपणे अनेक वर्षांनीही तो फोटो कोणता आणि कोणत्या ठिकाणी काढला, फोटोमध्ये कोण कोण आहे याची अचूक माहिती दिली तेव्हा तेथे उपस्थित माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गंगाधर काळे व त्यांचे चिरंजिव छायाचित्रकार गिरीश काळेही अवाक झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजीव गांधी, चंद्रशेखर, चरणसिंग, ग्यानी झैलसिंग, वसंतदादा पाटील यांच्यापासून ते प्रभा राव, मर्झबान पात्रावाला, आय.एच.एल. लतीफ यांच्यापर्यंत व राहुल बजाज यांच्यापासून ते हरिश्र्चंद्र बिराजदार व हिरामण बनकर यांच्यापर्यंत अनेकांसमवेतची छायाचित्रे पाहून पवारसाहेबही जुन्या आठवणींमध्ये रमले. पटापट त्यांनी त्या काळातील संदर्भ सांगितले आणि फोटोतील व्यक्तींचीही ओळीने माहिती दिली. 
काळ कोणासाठी थांबत नाही, तसा काळ किती झपाट्याने बदलला याची जाणीव हे फोटो पाहताना शरद पवार व गंगाधर काळे या दोघांनाही झाली. 

गाडीवरुन फिरू नका...

भेटीच्या प्रारंभीच नानांच्या प्रकृतीची चौकशी करत वयही विचारले. गाडीवरुन अजून फिरतात हे ऐकल्यावर आता या काळात घराबाहेर पडायचे टाळा आणि गाडी नका चालवू असा सल्लाही शरद पवार यांनी गंगाधर काळे यांना दिला. 

घोड्यावरचा फोटो हवाय...

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील जनवस्तूसंग्रहालय निर्माण केले तेव्हा प्रतिभाताई पवार यांनी पवारसाहेबांचा घोड्यावरचा फोटो मागून घेतला होता....गंगाधर काळे आठवण सांगत होते...लग्नातसुध्दा ते घोड्यावर बसले नाहीत. पण लोकांच्या आग्रहाखातर मात्र घोड्यावर बसले, असे सांगून प्रतिभाताईंनी हा फोटो माझ्याकडून गामामार्फत मागवून घेतला होता. बारामती तालुक्यातील विठ्ठलवाडी ते खांडज हे अंतर लोकांच्या आग्रहाखातर 1977 मध्ये त्यांनी घोड्यावरुन पार केले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Watched Old Photos in Baramati Pune