शरद पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्तुळात दाखल होणार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी चिंचवड शहरात सोळा वर्ष अजित पवार यांची एकहाती सत्ता होती. अचानक भाजपने मुसुंडी मारून सत्ता आणली त्यात शरद पवार दुखावले. आता त्यांची तिसरी पिढी पार्थ पवार राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. पार्थ पवार हे अनेक कार्यक्रमाला देखील उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांची राजकीय वर्तुळात उतरण्याची शक्यता दाट होत आहे. या सर्व घडामोडीमुळे विरोधकांना मात्र धडकी भरत आहे.
 

पुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पार्थ पवार हेही पिंपरी चिंचवड व मावळ मतदारसंघातील काही कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाल्याने या चर्चेला जोर चढला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्यानिमित्त शहरात लावलेले काही फलकांवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमवेत पार्थ पवार यांचेही छायाचित्र झळकले आहे. अजित पवार यांच्यासोबत पार्थ यांनी काही कार्यक्रमांत उपस्थिती दर्शविल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांतही याची चर्चा सुरू झाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता अजित पवार यांच्या ताब्यात पंधरा वर्षे होती. पिंपरी व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघात होतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा सामना आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी झाला होता. त्यावेळी मतदारसंघासाठी नवखे असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहूल नार्वेकर यांना एक लाख ब्याऐंशी हजार मते मिळाली होती. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा जगताप यांना होता. त्यानंतर जगताप हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. भाजप व शिवसेना स्वतंत्र लढल्यास, खासदार बारणे व आमदार जगताप हे रिंगणात असतील, मात्र युती झाल्यस बारणे यांच्यामागे भाजपची ताकद उभी राहणार का, हा चर्चेला मुद्दा राहील. त्याचवेळी यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीमध्ये शेकापही राहणार असल्यामुळे ही लढत अटीतटीची होईल. मतदारसंघातील या स्थितीमुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत होणाऱया चर्चेला महत्त्व आले आहे. 

खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, की, ''नवी पिढी राजकारणात सक्रिय होते आहे, ही चांगली गोष्ट आहे. तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात मला काही सांगता येणार नाही.''

शहरातील पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले, ‘‘ पार्थ पवार सध्या मावळ मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करीत आहेत. लोकसभा निवडणूक ते लढविणार किंवा कसे, ते आत्ता सांगता येणार नाही. पक्षाचे वरीष्ठ नेतेच त्यासंदर्भात निर्णय घेतील.''

पार्थ पवार निवडणूक लढविणार की नाही, हे आत्ताच निश्‍चित होणार नसले, तरी त्यांची शहरातील उपस्थिती मात्र राजकारणात चर्चेला विषय ठरली आहे. विरोधी पक्षाचे नेतेही त्यामुळे या नव्या फेरमांडणीकडे लक्ष देऊ लागले आहेत.

 

Web Title: Sharad Pawar's third generation will enter politics?