इंदापूरमध्ये रंगणार शरद युवा महोत्सव-२०१८

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

इंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खा. सुप्रिया सुळे असून, 21 आणि 22 डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे.

इंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खा. सुप्रिया सुळे असून, 21 आणि 22 डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे.

विद्या प्रतिष्ठान कॅम्पस, इंदापूर, जि. पुणे या ठिकाणी महोत्सव होणार आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्या प्रतिष्ठान या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. या महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यावर्षी १२ स्पर्धा प्रकारांमध्ये बारामती, दौंड, इंदापूर या ३ तालुक्यातील सुमारे ३००० हून अधिक युवा कलावंतांनी सहभाग नोंदविला आहे.

बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुक्याचे आ. दत्तात्रय भरणे असतील, तर झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिर झालं जी’चे कलाकार अजिंक्य व शीतल अर्थात नितिश चव्हाण व शिवानी बावकर हे उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहेत.

विद्या प्रतिष्ठान कॅम्पस, इंदापूर येथे इंग्लिश स्कूलच्या मैदानावरील मुख्य रंगमंचावर शुक्रवार, दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धा, दुपारी १२ ते २ यावेळेत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा व दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत वैयक्तिक गायन स्पर्धा, मुकाभिनय स्पर्धा व प्रहसन स्पर्धा संपन्न होणार आहेत तर पॉलीटेक्नीक कॉलेजच्या सभागृहात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत काव्य वाचन स्पर्धा संपन्न होणार आहे. कॉमर्स सायन्स कॉलेज, विद्या प्रतिष्ठान येथे दुपारी २.३० ते ४ या वेळेत निबंध स्पर्धा होणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार, दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत इंदापूर नगरपालिका मैदानावर छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे तर याच ठिकाणी १२ ते ५ वेळेत ढोल ताशा स्पर्धा संपन्न होणार आहे. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलच्या मैदानावरील मुख्य रंगमंचावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्या प्रतिष्ठान कॉमर्स सायन्स कॉलेज येथे करण्यात आलेले आहे. सायंकाळी ६ वाजेपासून मुख्य रंगमंचावर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. 

या दोन्ही दिवशी इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातील युवक युवतींनी व नागरिकांनी युवा कलावंतांचा कलाविष्कार पाहण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: sharad yuva mahotsav in indapur