नेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थी, प्राध्यापकांना परस्परदेशांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास यांचे आदानप्रदान करता येणार आहे.

बारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थी, प्राध्यापकांना परस्परदेशांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास यांचे आदानप्रदान करता येणार आहे.

कौशल्याधारित शैक्षणिक प्रशिक्षण व परस्पर सहकार्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा या करारामागील हेतू आहे. यामध्ये नेपाळमधील बालकुमारी कॉलेज चितवन आणि बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाचा या कराराचा संबंध आहे. यामध्ये बारामती आणि नेपाळ किंवा बारामती व बांगलादेश यांनी एकमेकांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये सहभागी होणे व विविध अभ्यासक्रमांच्या विकासासाठी योगदान देण्याचा समावेश आहे. 

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने या सामंजस्य करारांतर्गत इंटरनॅशनल स्टुडंट एक्‍स्चेंज प्रोग्रॅम ७ ते १२ जानेवारीदरम्यान घेतला. यामध्ये चितवनच्या बालकुमारी कॉलेजमधील नऊ विद्यार्थी व बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाच्या जीवरसायन व आण्विक जीवशास्त्र विभागाचे अकरा विद्यार्थी शारदानगर येथे सहभागी झाले होते.

यामध्ये नेपाळचे प्राध्यापक डॉ. अनुप मुनी वज्राचार्य व बांगलादेशच्या प्रा. डॉ. तंझिमा यास्मीन हे दोन प्राध्यापक सहभागी होते. शारदानगर महाविद्यालयाने या विद्यार्थी, प्राध्यापकांकरिता जिवाणू खते निर्मिती तंत्रज्ञान, बॅक्‍टेरियल आयडेंटीटीफिकेशन, मॉलिक्‍युलर बायोलॉजी तंत्र या विषयावर कार्यशाळा घेतली. यानिमित्ताने या विद्यार्थ्यांनी श्रायबर डायनामिक्‍स, फोर सीझन वायनरी, तिरुपती ॲग्रो, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आसवनी व माळेगावच्या नियाम या संस्थेला भेट दिली.

शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाच्या विकासासाठी अशाच परस्पर सहकार्याची गरज आहे. आजचे जग जैवतंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचा प्रगतीसाठी वापर केला पाहिजे.
- राजेंद्र पवार, प्रमुख, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

परदेशी विद्यार्थ्यांशी साधला संवाद 
या सामंजस्य करारावेळी मायक्रोबॉयोलॉजिस्ट सोसायटी इंडिया या संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य आर. बी. देशमुख व नेपाळ व बांगलादेशच्या वतीने अनुक्रमे डॉ. अनुप मुनी वज्राचार्य व प्रा. डॉ. तंझिमा यास्मीन यांनी करारांच्या प्रतींचे हस्तांतर केले. या भेटीच्या निमित्ताने संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनीही परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व संस्थेमार्फत सुरू असलेल्या कर्मवीर योजना, भीमथडी जत्रा, महिला बचत गट, मासिक पाळी स्वच्छता उपक्रम याविषयी माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharadanagar Nepal Bangladesh Agreement