‘ईएमआय’वर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

वैद्यकीय उपचार केव्हाच सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. वैद्यकीय विमा नसेल तर कर्ज काढून, शेती विकून किंवा दागिने गहाण ठेवून उपचाराचा खर्च केला जातो. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ‘ईएमआय’पद्धतीने उपचार हा प्रभावी मार्ग ठरला आहे. लेप्रो ओबेसो सेंटर येथे या माध्यमातून ९० दिवसांमध्ये ५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 

शहरातील बड्या रुग्णालयांतील उपचार म्हणजे खर्चाचा महापूर असे वर्णन केले जाते. रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या नातेवाइकांच्या हातात खरंतर फारसं काही राहात नाही. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या महागड्या रोगनिदान चाचण्या कराव्याच लागतात आणि औषधांना तर कोणताच पर्याय नसतो. याबरोबरच रुग्णालयातील खर्च आणि डॉक्‍टरांची फी असते. त्यामुळे वैद्यकीय विमा नसेल, तर ही सर्व रक्कम रोख भरावी लागते. आताच्या भाषेत बोलायचे, तर डेबिट किंवा क्रेडिट कार्डने अदा करावी लागते. शस्त्रक्रियेच्या पैशांची तयारी प्रत्येक वेळेला होतेच असे नाही. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलणे हाच शेवटचा पर्याय असतो. पण, त्यातून शस्त्रक्रियेतील गुंतागुंत वाढण्याचा धोका डॉक्‍टरांना जाणवत असतो. त्यामुळे वेळीच शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि उपचारांचा खर्चही उभारण्यासाठी ‘ईएमआय’वर शस्त्रक्रिया हा पर्याय पुढे आला आहे. 

याबाबत माहिती देताना ‘लेप्रो ओबेसो सेंटर’चे प्रमुख आणि बॅरिॲट्रिक शल्यचिकित्सक डॉ. शशांक शहा म्हणाले, ‘‘सामान्य नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी उपचार मिळाले पाहिजेत, त्यावर फक्त मूठभर श्रीमंतांचा हक्क राहू नये. त्यामुळे सामान्य रुग्णांना परवडणाऱ्या खर्चात वैद्यकीय उपचार मिळणे आवश्‍यक आहे. त्यातून ‘ईएमआयवर शस्त्रक्रिया’ ही संकल्पना पुढे आली. गेल्या नव्वद दिवसांमध्ये या योजनेतून पन्नास यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यासाठी एका वित्तीय संस्थेशी करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कर्ज घेणाऱ्या रुग्णाचे व्याज रुग्णालय वित्तीय संस्थेला देते, त्यामुळे रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांना शून्य टक्के व्याजदराने एका वर्षासाठी हे कर्ज मिळते. कर्जाचे हप्ते वर्षभरापेक्षा जास्त असल्यास कमी व्याजदाराने हे कर्ज रुग्णाला मिळण्याची सुविधा यात केली आहे.’’  

रुग्णालयातील खर्च म्हणजे एकरकमी पैसे भरण्याची आत्तापर्यंतची आपली पद्धत आहे. अनेक वेळा हे पैसे जमा करण्यात काही ना काही अडथळे येतात. आपल्या आरोग्यापेक्षा इतरांना प्राधान्य देण्याची मानसिकता असते. त्यामुळे प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाते. त्यातून गुंतागुंत वाढते. हे टाळून रुग्णावर वेळीच प्रभावी उपचार करता यावे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. 

पैसे जमा करून शस्त्रक्रिया करण्याचा विचारही न करू शकणाऱ्या समाजघटकांचा या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. त्यातून रिक्षाचालकाच्या मुलाची शस्त्रक्रियादेखील झाली आहे. यातून स्थूलतेसह इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियाही रुग्णांना करतात येतात, असेही डॉ. शहा यांनी सांगितले.

Web Title: shashank-shah sucess story