सिंहगड रस्त्यावरील बसथांब्यांच्या शेड गायब 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सिंहगड रस्त्यावरील अनेक पीएमपी बसथांब्यांचे शेड काढण्याचा धडाका पीएमपी प्रशासनाने लावला आहे. संतोष हॉल, गोयलगंगा येथील बसथांब्यांचे शेड नसल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना भरउन्हात बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील अनेक पीएमपी बसथांब्यांचे शेड काढण्याचा धडाका पीएमपी प्रशासनाने लावला आहे. संतोष हॉल, गोयलगंगा येथील बसथांब्यांचे शेड नसल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना भरउन्हात बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. 

सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे, माणिकबाग, धायरी, वडगाव, नांदेड गाव, खडकवासला येथे राहणारे हजारो नागरिक पुण्यात कामाकरिता व शिक्षणाकरिता पीएमपी बसने प्रवास करतात. त्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा देणे गरजेचे आहे. पण, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. प्रमुख रस्त्यावरील बहुतांश बसथांब्यांना बस शेडच नाहीत. आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. त्यात भर म्हणून की काय आहेत ते शेड काढून टाकण्यात आले आहेत. नवीन बसशेड उभारण्याच्या नावाखाली हे काढण्यात आले आहेत; पण गेल्या पंधरा दिवसांपासून कोणत्याही प्रकारचे काम सुरू असल्याचे दिसून येत नाही. बसथांब्यांच्या शेजारीच खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व पॅगो उभ्या असतात. तसेच भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले उभे असतात. या सर्वांमधून प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून बस पकडावी लागते व उतरावे लागते. पीएमपी व महापालिका प्रशासनाने त्वरित बसथांबे व शेड बसवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोरील बसथांब्याचे शेड काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले आहे. शेड नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते. थांब्यापासून कधी पुढे तर कधी मागे बस थांबते. त्यामुळे धावत जाऊन बस पकडावी लागते. अनेक महिला पडल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने योग्य दखल घेऊन थांबे पूर्ववत करावेत. 
- निकिता गवळी, प्रवासी 

माणिकबाग व जगताप हॉस्पिटलजवळील बसथांब्यांचे शेड काढून टाकण्यात आले आहे. आहेत ते पण दुरवस्थेत. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून, प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्वरित बसथांबे व शेड बसवावेत. 
- शिवाभाऊ पासलकर, अध्यक्ष, पुणे पालक संघटना 

माणिकबाग व जगताप हॉस्पिटल येथील बसथांबा शेड धोकादायक स्थितीत असल्याने काढण्यात आले. शेड पडण्याची शक्‍यता होती. प्रवासी सुरक्षेसाठी ते काढले आहेत. लवकरात लवकर नवीन बस शेड उभारण्यात येणार आहेत. 
- निरंजन तुळपुळे, अभियंता, पीएमपी प्रशासन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sheds of settlers on Sinhagad road disappear