शिरोळे यांचा उपोषणाचा निर्णय मागे 

शिरोळे यांचा उपोषणाचा निर्णय मागे 

पुणे : महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार अनिल शिरोळे यांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जाहीर केलेले उपोषण मागे घेतले. शहरातील पाणीपुरवठा विस्कळित असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांबरोबर रविवारी (ता. 28) संयुक्त बैठक आयोजित केली गेली आहे. 

शिवाजीनगर भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नावर या भागातील नागरिकांनी खासदार शिरोळे यांच्या कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे खासदार शिरोळे यांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेसमोर शनिवारी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. सत्ताधारी भाजपच्याच खासदारांनी पाणी प्रश्‍नावर उपोषण करण्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. महापौर मुक्ता टिळक यांनी खासदार शिरोळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थिती सांगितली. या प्रश्‍नावर रविवारी आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर संयुक्त चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिल्यानंतर शनिवारी शिरोळे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले. 

"आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर उद्या चर्चा होणार आहे. नागरिक माझ्याकडे पाण्याविषयीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या सर्व तक्रारी मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती समजून घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे'' असे खासदार शिरोळे यांनी सांगितले. सोमवारपासून नवीन वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. या वेळापत्रकानुसार शहराच्या सर्व भागांत सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा महापालिका प्रशासन करीत असले तरी शहराच्या बहुतेक भागांतील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत होऊ शकला नाही. मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये अपुरे आणि कमी वेळ पाणी दिले जात आहे. उपनगरांमध्येही हीच परिस्थिती आहे. पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी प्रत्येक प्रभाग समितीची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस साप्ताहिक सुटीचे आल्याने या प्रभाग समितीच्या बैठका सोमवार आणि मंगळवारी होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com