‘शिरसाई’चे पाणी सोडल्याने आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषण व आंदोलनानंतर आज दुपारी तीनच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचे शेतकऱ्यांनी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला. 

उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषण व आंदोलनानंतर आज दुपारी तीनच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचे शेतकऱ्यांनी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला. 

बारामतीच्या जिरायती भागातील गोजुबावी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बनवाडी, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, कारखेल, साबळेवाडी, गोलांडवाडी, खराडेवाडी, शिर्सुफळ आदी परिसरांत सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. योजनेचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी उंडवडी कडेपठार येथे माजी सरपंच विठ्ठल जराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा शेतकऱ्यांनी सहा दिवस उपोषण व वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारच्या वतीने तहसीलदार हनुमंत पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आंदोलनकर्त्यांना तोंडी व लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित विभागाला लेखी पत्र देऊन जनाई शिरसाई योजनेचे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार आज दुपारी शिरसाई योजना कार्यान्वित करून योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच काही प्रमाणात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी उपसा सिंचन योजनेचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अमोल शिंदे, उंडवडी क.प. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल जराड, उंडवडी सुपेचे उपसरपंच पोपट गवळी, आंदोलनकर्ते शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirsai Irrigation Scheme Water