डॉ. कोल्हे उद्या अज्ञातवासातून परतणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe

Pune : डॉ. कोल्हे उद्या अज्ञातवासातून परतणार ?

कोरेगाव भीमा (पुणे) : सोशल मिडीयावर पोस्ट टाकून गेल्या रविवारपासून चिंतनासाठी एकांतवासात गेलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निर्णयाबाबत सध्या सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना डॉ. कोल्हे अज्ञातवासातून परतल्यानंतरच पुर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे पून्हा कधी परतणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान डॉ. कोल्हे उद्या (ता. १३) पुन्हा कार्यरत होणार असल्याची खात्रीलायक शक्यताही वर्तवली जात आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी मानसिक थकवा दूर करण्यासाठी एकांतवासात जात असल्याची पोस्ट रविवारी पहाटे समाज माध्यमावर टाकली. तसेच पीएसह जवळच्या कार्यकर्त्यांनाही न सांगता आपले वाहन, वाहनचालक तसेच अंगरक्षकांनाही न घेता अज्ञातस्थळी गेल्याने त्यांच्या या निर्णयाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.

यामध्ये खासदारकीच्या जबाबदाऱ्या तसेच अभिनय क्षेत्रातील कार्य याचा समन्वय साधणे तसेच एखाद्या नव्या मालिकेची तयारी असेल का ? यासह यापूर्वी घेतलेले कोणते निर्णय असे आहेत की, ज्याबाबत त्यांना पूनर्विचार करण्याची गरज वाटत आहे. याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मात्र काही नवा राजकीय निर्णय घ्यावा, अशी तरी सद्य:स्थिती दिसत नाही. तसेच निवडणुकाही नाहीत, अन् डॉ. कोल्हे यांनीही असे काही विधान केलेले नाही.

हेही वाचा: राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

कोरोना काळातील बंधनांमुळे कंटाळलेले अनेकजण कुटूंबासह निसर्ग पर्यटनासाठी गेले तर अनेक राजकारणीही परदेशात सुट्या घालवण्यासाठी जातात, त्यांच्याबद्दल कधी चर्चा होत नाही. मात्र कोरोनाकाळात लसीकरणासह आरोग्यसुविधांसाठी सतत कार्यरत असलेले डॉ. कोल्हे चिंतनासाठी गेले तर बिघडले कुठे ? अशीही मत-मतांतरे नागरीकांकडून व्यक्त होत आहेत.

दरम्यान याबाबत डॉ. कोल्हे यांनी कोणालाही सांगितले नसले तरी जाण्यापूर्वी त्यांनी पक्षनेतृत्वाला मात्र नक्कीच पूर्वकल्पना दिली असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. तसेच रविवार पासूनच्या चिंतनानंतर उद्या ते पुन्हा परतण्याची शक्यताही विश्वसनीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

डॉ. कोल्हे पून्हा परतल्यानंतर दरम्यानच्या काळात डॉ. कोल्हे कोठे गेले होते, त्यांनी काय चिंतन केले, या बाबतच्या माहितीची पोस्टही त्यांच्या कडून समाज माध्यमावर टाकली जाण्याची अथवा याबाबत पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतरच सध्याच्या सुरु असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

loading image
go to top