शिरूर पोलिसांची अवैध वाळू धंद्याविरोधात धडक मोहिम 

शिरूर पोलिसांची अवैध वाळू धंद्याविरोधात धडक मोहिम 

शिरूर : अवैध वाळू धंद्याविरोधात, शिरूर पोलिसांनी धडक मोहिम उघडली असून, वाळूचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक करणा-या वाळू तस्करांची धरपकड सुरू केली आहे. गेल्या दोन तीन दिवसात तालुक्याच्या विविध भागात छापे टाकून वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, जेसीबी, हायवा ट्रक व इतर यंत्रसामग्री मिळून सुमारे तीन कोटी रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शिरूर तालुक्यात बेकायदा वाळू धंद्याचे स्तोम माजल्याने कठोर कारवाईच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी वाळूतस्करांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक बिरूदेव काबुगडे व किरण उंदरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व सुनिल मोटे तसेच संतोष साठे, अनिल आगलावे, उमेश भगत, प्रशांत खुटेमाटे, प्रवीण पिठले, करणसिंग जारवाल, संजय जाधव, ताराचंद जाधव, शंकर चव्हाण या पोलिस पथकाने निमोणे जवळील कु-हाडवाडी येथे रविवारी रात्री तर आमदाबाद फाटा येथे आज पहाटे छापे टाकले.

यावेळी घोडनदी व कुकडी नदीच्या पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसून ती हायवा व इतर ट्रकमध्ये भरून चोरटी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी वाळूतस्करांची धरपकड सुरू केली. यात काही जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

नितीन चांगदेव सूर्यवंशी (वय ३३), संजय आसाराम राठोड (वय ३३, दोघे रा.पाचर्णे मळा, शिरूर), राजू विठ्ठल रोकडे (वय ४०, रा. मोरे वस्ती, चिखली, पिंपरी - चिंचवड), चेतन राजकुमार परदेशी (वय २६, रा. रामलिंग, शिरूर), बाळू विलास सांगळे (रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. नगर), ऋषिकेश ज्ञानदेव कर्डिले (रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर, जि. पुणे), उमाकांत शंकर सूर्यवंशी (रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), सौरभ बापू शितोळे (रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे) व बिभीषण बाबुराव गवारे (रा. बाबूराव नगर, शिरूर, जि. पुणे) या वाळू तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या इतर साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी दिली.

हरित लवादाच्या नियमांचा भंग; तसेच गौण खनिजाचा अवैध, बेसुमार उपसा आणि चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून, कारवाईवेळी पळून गेलेल्या वाळू माफीयांचा पोलिस कसोशीने शोध घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. आमदाबाद फाटा येथील छाप्यात एक हायवा, दोन ट्रक व १२ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, कु-हाडवाडी येथील छाप्यात चार ट्रक जप्त करण्यात आले; तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणा-या आठ लोखंडी बोटी जप्त करून त्या जागेवरच फोडून टाकल्या असल्याचे खानापुरे यांनी सांगितले. 

अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरली गेलेली वाहने त्यात ट्रक, हायवा व वाळू उपशासाठी वापरले जाणारे जेसीबी मशिन जप्त करण्यात आले असून, त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. शिवाय जप्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, त्यांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी तालुका दंडाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. -प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन  

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com