शिरूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या बहाद्दरांना पाठलाग करून पकडले

Shirur-Police-Station
Shirur-Police-Station

शिरूर - आलिशान मोटार आडवी घालून, 'तु कट मारल्याने आमची मोटार डॅमेज झाली असून दुरूस्तीसाठी पैसे दे', अशी दमदाटी करीत ट्रक, टेम्पोचालकांना विनाकारण मारहाण करून लुटणा-या पाच जणांच्या टोळीतील तिघांना शिरूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असताना पाठलाग करून पकडले. शिरुर - चौफुला रस्त्यावर मध्यरात्री घडलेल्या या थरारातून पोलिसांनी  फॉर्च्युनर मोटारीसह पिस्तुल, तलवार, फायटर आदी हत्यारे जप्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडके (वय ३२) व अनिल हनुमंत चव्हाण (वय १९, दोघे रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन तरूणास अटक करण्यात आली असून, शिरूर न्यायालयाने त्यांना आज एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. त्यांनी सात - आठ गुन्ह्यांची कबूली दिली असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. हे आरोपी सुस्थित कुटूंबातील असावेत असा अंदाज असून, एकाचा दौंड तालुक्यात पेट्रोल पंप आहे. केवळ चंगळ आणि चैनीसाठी गेल्या काही दिवसांपासून ते हे उद्योग करीत असताना पोलिसांनी पाळत ठेवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

शिरूर - चौफुला रस्त्यावर गेल्या काही दिवसांत वाहन चालकांना लुटल्याच्या अनेक तक्रारी आल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत या परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानूसार शिरूरचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व बाळासाहेब जगताप तसेच; संतोष साठे, संजय जाधव, प्रफुल्ल भगत, मुकूंद कुडेकर, प्रवीण पिठले, प्रशांत खुटेमाटे, प्रवीण राऊत, उमेश जायपत्रे, तुकाराम गोरे या पोलिसांचे पथक मध्यरात्री एकच्या सुमारास शिरूर - चौफुला रस्त्यावर स्वतंत्र वाहनांतून गस्त घालत असताना, आंधळगाव फाट्याजवळ एमएच १२ आरआर ९००० या क्रमांकाची आलिशान फॉर्च्युनर उभी असल्याचे व बाजूलाच सहा तरूण संशयास्पदरित्या दबा धरून बसल्याचे दिसल्यावर पोलिसांनी आपला मोर्चा त्यांच्या दिशेने वळवला. पोलिसांचे वाहन पाहताच तरूण मोटारीत बसून चौफुल्याच्या दिशेने सुसाट पळूने गेले.

दरम्यान, शिरूरच्या पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करतानाच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याने चौफुला बाजूकडूनही पोलिस पथकाची वाहने आली. भरधाव जाणा-या या मोटारीला चौफुला येथे पोलिस वाहन आडवे घालून थांबण्याचा इशारा केला असता रस्त्याकडेला मोटार उभी करून ते सहाजण शेतात पळून गेले. मात्र, पोलिसांनीही वाहने बाजूला लावून त्यांचा पायी पाठलाग केला. अंधार, काटेरी झाडेझुडपे व गर्द झाडीचा फायदा घेत दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. तथापि, इतर तिघांच्या पोलिसांनी सौम्य बळाचा वापर मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पिस्तुल, तलवार, फायटर आदी घातक शस्त्रांबरोबरच दांडके, रस्सी, दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या फॉर्च्युनर जीपमध्ये आणखी दोन नंबरप्लेट आढळून आल्या. शिवाय मोटारीला लावलेली नंबरप्लेटही तपासामाध्ये बोगस असल्याचे निष्पन्न झाले. दरोड्याच्या तयारीतील ही टोळी पकडल्याने आणखी अनेक उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींनी सात ते आठ गुन्ह्यांची कबूली दिली असली; तरी यातील काही गुन्हेच दाखल आहेत. लूटीच्या रकमा कमी असल्याकारणाने अनेक वाहनचालकांनी तक्रारी दिल्या नसाव्यात. तरीही अशा प्रकारे लूटमार झाली असल्यास शिरूर पोलिसांशी (दूरध्वनी क्रमांक: 02138 : 222139) तातडीने संपर्क साधावा. या आरोपींविरूद्ध इतर पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेत आहोत.          
प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, शिरूर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com