शिरूरला एक कोटीच्या रद्द नोटा जप्त 

शिरूरला एक कोटीच्या रद्द नोटा जप्त 

शिरूर - चलनातून रद्द केलेल्या एक हजार व पाचशेच्या सुमारे एक कोटी २६ हजार रुपयांच्या नोटा शिरूर पोलिसांनी कवठे येमाई (ता. शिरूर) येथे गस्तीदरम्यान जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

गणेश शिवाजी कोळेकर (वय २५, रा. सविंदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नऱ्हे (वय २१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) व अमोल देवराम दसगुडे (वय २५, रा. कर्डेलवाडी, ता. शिरूर) यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध ‘दी स्पेसिफाइड बॅंक नोट्‌स’ या सन २०१७ च्या नवीन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आणखी एका मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्याच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

शिरूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर हे गेल्या शुक्रवारी (ता. ७) रात्री सुरेश चौधरी, बाळासाहेब हराळ, प्रकाश कोकरे, विशाल पालवे या पोलिस पथकासह तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात गस्त घालत होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान कवठे गावात येत असताना रस्त्याच्या कडेला एक ‘ह्युंदाई इऑन’ मोटार (एमएच १४ ईयू ११९४) त्यांना आढळून आली. त्यातील तरुणांची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता मोटारीत एका बॅगमध्ये चलनातून रद्द केलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्या एक कोटी २६ हजार रुपयांच्या भरल्या.  

बिल्डरची रक्कम?
आरोपींची कसून चौकशी केली असता दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी होण्याआधी पिरंगुट (ता. मुळशी) येथील परेश शिरोळे या बांधकाम व्यावसायिकाने या जुन्या नोटा बदलून नवीन चलनात रूपांतरित करून चलनात आणण्यासाठी त्यांच्याकडे दिल्या होत्या, अशी माहिती समजली. त्याआधारे शिरोळे याच्याकडे तपासाचा प्रयत्न केला असता तो फरार झाला. या तरुणांकडे गेल्या दोन वर्षांपासून या नोटा होत्या. परंतु, त्या बदलून घेण्याचे प्रयत्न फसल्याने अखेर पुन्हा या नोटा घेऊन शिरोळे याला देण्यासाठी ते चालले होते, असे शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सारंगकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com