शिरूर रस्त्यावरील कोंडी सोडवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोरेगाव भीमा - पुणे - शिरूर महामार्गावर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व नागरिक त्रस्त आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी औद्योगिक पट्ट्यातील जड वाहने, तसेच शाळा महाविद्यालयांच्या वाहनांच्या वेळेत बदल करावेत. महामार्ग पोलिस मदत केंद्र सुरू करावे, अशी मागणी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक अरुणदादा करंजे यांनी महामार्ग विभागाकडे केली आहे.

याबाबत करंजे म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्‍यातून पुणे-नगर महामार्ग, चाकण-शिक्रापूर चौफुला महामार्ग, शिरूर- न्हावरा चौफुला असे महामार्ग आहेत. पुणे-नगर महामार्गवरील वाघोली, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, रांजणगाव गणपती या ठिकाणी वाढत्या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्याचा स्थानिक पोलिस यंत्रणेवरही ताण येत असतो. कोंडीमुळे वैद्यकीय मदत न मिळाल्यास जखमी व रुग्णांचा नाहक बळी जातो.’’ 

जड वाहने व शाळा, महाविद्यालयांच्या बसेसच्या वेळेत नियोजनपूर्वक बदल केल्यास एकाच वेळी ही वाहने रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होणार नाही. उद्योजकांनीही पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन देण्यासह शक्‍य तो पुढाकार घ्यावा. लोणीकंद व शिक्रापूर पोलिस ठाण्याला वाहतूक नियोजनासाठी वाढीव पोलिस द्यावेत, अपघातप्रसंगी जखमींना मदत व वाहतूक सुरळीत करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी महामार्ग पोलिस मदत केंद्र झाल्यास रुग्णांचे प्राण वाचून वाहतूक कोंडीही सुटू शकेल. 

साइडपट्ट्यांची दुरुस्ती आवश्‍यक
वाघोली ते शिक्रापूर या दरम्यान रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीवर रस्ता रुंदीकरण व बायपास हा अखेरचा पर्याय असला, तरी सध्याच्या स्थितीत साइडपट्ट्या व खड्डे दुरुस्ती आवश्‍यक आहे. तसेच लोणीकंद येथील तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेल्या स्पीडब्रेकरची दुरुस्ती करून वाहतूक पोलिस वाढवल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.

Web Title: Shirur Road Traffic