माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांना आजही `लाल डबा` आवडता

नागनाथ शिंगाडे
मंगळवार, 26 जून 2018

शिरूर तालुक्यातील माजी आमदार सूर्यकांत पलांडे हे आपल्या आक्रमक वक्तृत्त्व शैलीबद्दल ओळखले जातात. शेतीप्रश्नावरही त्यांचा चांगला अभ्यास आहे. वयाच्या ७६ व्या वर्षात ते सामाजिक आणि संस्थात्मक कामात क्रियाशील असतात. विशेष म्हणजे ते आजही प्रवास एसटीने करतात.

तळेगाव ढमढेरे (शिरूर, पुणे): सध्याचे पुढारी, आमदार, खासदार व कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी हायफाय चारचाकी गाडीत बसून प्रवास करणेच पसंत करतात. परंतु शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे हे अजूनही नेहमी दुरच्या अंतरावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एसटीने) प्रवास करणे पसंत करतात. श्री. पलांडे शासनाच्या सवलतीचा आनंदाने फायदा वयाच्या 76 व्या वर्षीही घेत आहेत

एसटीने प्रवास आनंदी, बिनधास्त व सुखाचा होतो असे श्री. पलांडे यांचे मत आहे. या प्रवासामुळे बहुतांश एसटी वाहक (कंडक्टर) त्यांना वैयक्तिक ओळखतात. आपुलकीने बसण्यासाठी जागा देतात. एसटीतून उतरतानाही कंडक्टर रस्त्यावर उतरेपर्यंत काळजी घेतात. म्हणजेच वाहक उत्तम प्रकारची सेवा देतात.

एसटीच्या प्रवासामुळे सर्वसामान्यांत बसण्याची नामी संधी मिळते. प्रवाशांची ओळख झाल्यानंतर गप्पाठप्पा करायला मिळतात. शिवाय प्रवास करताना मनात कसलाच धोका राहत नाही. विशेष म्हणजे शिरूर-पुणे-मुंबई असा एसटीने प्रवास श्री पलांडे नेहमीच करतात. या प्रवासात एक आगळावेगळा आनंद मिळतो. श्री. पलांडे यांच्या एसटीतील प्रवासाचे तालुक्यातील लोक नेहमीच कौतुक करताना दिसतात.

पलांडे यांचे चिरंजीव संजीव हे राज्य सरकारच्या सेवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत.

Web Title: shirur taluka ex mla suryakant palande travel st bus